महिला भारतीय क्रिकेटने तब्बल ७ वर्षानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मिताली राजच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने ७ वर्षानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. या सामन्याला ब्रिस्टलच्या मैदानावर काल (१६ जून) पासून सुरुवात झाली. या सामन्यासाठी भारतीय संघाने अनेक नवीन चेहऱ्यांना संघात स्थान दिले आहे. यातीलच एक म्हणजे स्नेह राणा.
फिरकीपटू असलेल्या स्नेह राणाने इंग्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विशेष म्हणजे या पदार्पणाच्या सामन्यातच तिने लक्ष वेधून घेतले. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी तिने भारताकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. आपली ही कामगिरी तिने आपल्या दिवंगत वडिलांना समर्पित केली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवड होण्यापूर्वीच स्नेहाच्या वडिलांचे निधन झाले होते.
स्नेह राणाने ब्रिस्टल कसोटी सामन्यात भारताच्या पुनरागमनात एक महत्वपूर्ण भूमिका बजावली. एक वेळ होती जेव्हा इंग्लंड संघ २ बाद २३९ अशा सुस्थितीत होता. परंतु, त्यानंतर स्नेह राणा (३/७७) आणि अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा (२/५०) या दोघींनी दिवसाच्या शेवटच्या सत्रात दोन-दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. आणि त्यामुळे भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करता आले.
या कामगिरीबद्दल स्नेहाने ब्रिस्टल कसोटीचा पहिला दिवसाचा खेळ संपल्यानंतर सांगितले की, “जेव्हा इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात माझी निवड झाली, त्याच्या काही वेळापूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले होते. हे माझ्यासाठी थोडे अवघड होते आणि हा माझ्यासाठी एक भावनिक क्षण होता. कारण मी भारतीय संघासाठी खेळावे, ही माझ्या वडिलांची इच्छा होती. परंतु ही इच्छा पूर्ण झाली तेव्हा ते पाहायला माझे वडील दुर्दैवाने हयात नाही. परंतु , हा एक आयुष्याचा भाग आहे. वडील गेल्यानंतर मी जे काही केले किंवा पुढे जे काही करेल, ते सगळे मी त्यांना समर्पित करेल.”
All-rounder Sneh Rana dedicates her #TeamIndia comeback to her late father. #ENGvIND pic.twitter.com/PHl4XHkjZT
— BCCI Women (@BCCIWomen) June 16, 2021
“खेळपट्टीवर सुरुवातीपासूनच चेंडू फिरत होता”
स्नेहने या सामन्याच्या खेळपट्टीबाबत बोलताना सांगितले की, “खेळपट्टी सुरुवातीपासूनच धीम्यागतीची होती. परंतु, गोलंदाजी करताना सुरवातीपासूनच चेंडू फिरत होता. तशी ही खेळपट्टी फलंदाजांसाठी उत्तम आहे. मला वाटते की उर्वरित सामन्यातही खेळपट्टी अशीच राहील.” या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ६ बाद २६९ धावा केल्या होत्या. इंग्लंडची कर्णधार हीथर नाइटने सर्वाधिक ९५ धावा केल्यात. स्नेहने या डावात टैमी ब्यूमोंट, एमी जोन्स आणि जॉर्जिया एल्विस यांच्या विकेट घेतल्या.
स्नेहाने ५ वर्षानंतर केले भारतीय संघात पुनरागमन
स्नेहाने ५ वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. ती म्हणाली “स्थानिक क्रिकेटमध्ये चांगल्या प्रदर्शनाचे मला हे बक्षीस मिळाले आहे. मला दुखापत झाल्यामुळे मी क्रिकेटपासून एक वर्ष दूर होती. परंतु, त्यानंतर मी सतत देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिली आणि चांगल्या प्रदर्शनाच्या जोरावर मी भारतीय संघात पुनरागमन केले. त्यामुळे प्रयत्न करणे कधीच सोडू नये. लोक माझ्या पुनरागमनातून प्रेरणा घेऊ शकतात.”
महत्वाच्या बातम्या
चालू मॅचमध्येच १२१ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या क्रिकेटरने दुसऱ्या खेळाडूला फेकून मारली ‘वीट’
केवळ विराट-रोहित नाही तर, ‘या’ भारतीय खेळाडूचं आहे न्यूझीलंडला सर्वाधिक टेंशन