भारतीय गोल्फर अदिती अशोक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यापासून हुकली आहे. अदितीने शेवटच्या होलमध्ये पदक गमावले आहे. तर अमेरिकेच्या नेली कोर्डाने सुवर्ण जिंकले आहे. अदिती १३ व्या होलपर्यंत दुसऱ्या क्रमांकावर होती. पण शेवटच्या ५ होलमध्ये ती जपानच्या मोने इनामी आणि न्यूझीलंडच्या लिडियाच्या मागे पडली होती. तर चौथ्या फेरीत अदिती अशोकने तीन अंडर ६८ चे कार्ड खेळले होते. स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर, अदितीने १५ अंडर २६९ गुणांसह चौथे स्थान मिळवले होते. यजमान जपानच्या मोने इनामीने रौप्य पदक जिंकले, तर रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या लिडियाने कांस्यपदक पटकावले आहे.
ऑलिम्पिकमधील ऐतिहासिक पदकाच्या जवळ आलेली अदितीने शनिवारी सकाळी दुसऱ्या क्रमांकापासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. पण ती नंतर मागे पडली. अदिती संपूर्ण वेळ पदकाच्या शर्यतीत होती, पण दोन बोगींसह ती लिडियाच्या मागे पडली, जिने शेवटच्या फेरीत नऊ बर्डी बनवल्या होत्या. असे असूनही रिओ ऑलिम्पिकमध्ये ४१ वे स्थान मिळवणाऱ्या अदितीने संस्मरणीय कामगिरी केली आहे.
तसेच गोल्फ या खेळाकडेही तिच्या यशामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. भारतात गोल्फ फारसा लोकप्रिय खेळ नाही. पण आता अदितीच्या या यशाने इतिहास घडवला आहे. त्यामुळे तिचे सध्या देशभरातून कौतुक होत आहे.
अदिती अशोकबद्दल थोडीशी माहिती
अदितीचा जन्म २९ मार्च १९८८ रोजी कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे झाला आहे. सध्या ती भारतातील सर्वोत्तम महिला गोल्फर आहे. अदितीने वयच्या अवघ्या ५ व्या वर्षापासून गोल्फ खेळायला सुरुवात केली आहे. अदिती एकदा वडील अशोक गुडलमणी आणि आई मॅश यांच्यासोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. ते रेस्टॉरंट गोल्फ कोर्सच्या शेजारी होते. गोल्फ कोर्समधून जयजयकार ऐकल्यानंतर ती खेळाकडे आकर्षित झाली. यानंतर अदितीने तिचे वडील अशोक आणि आई मॅश यांच्यासोबत गोल्फ खेळायला सुरुवात केली होती.
गोल्फ हा खेळ लवकरच अदितीच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला होता. तिला कुटुंबाकडूनही पूर्ण सहकार्य मिळाले. वयाच्या ९ व्या वर्षी, या तरुण गोल्फरने तिची पहिली स्पर्धा जिंकली आणि वयाच्या १२ व्या वर्षी ती राष्ट्रीय संघाचा भाग बनली होती. अदिती लेडीज युरोपियन टूरचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय आहे. २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करताच अदितीने सर्वात तरुण गोल्फर होण्याचा मान मिळवला होता. रिओमध्ये अदितीच्या वडिलांनी कॅडीची भूमिका केली होती. तर टोकियोमध्ये तिच्यासोबत तिची आई होती.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने मिळवले ६ पदके
भारताने आतापर्यंत टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण ६ पदके जिंकली आहेत. आता भालाफेकपटू नीरज चोप्राकडून सुवर्णपदक मिळण्याची आशा आहे. भारतासाठी पहिले रौप्य पदक वेटलिफ्टर मीराबाई चानूने २४ ऑगस्ट रोजी जिंकले होते. यानंतर, पीव्ही सिंधू आणि लवलिना बोर्गोहेन यांनी बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये प्रत्येकी कांस्यपदक जिंकले आहे. यानंतर पुरुष हॉकी संघाने भारताला टोकियो क्रीडा स्पर्धेचे चौथे पदक मिळवून दिले आहे. तर पैलवान रवी दहिया याने गुरुवारी (५ ऑगस्ट) भारताला दुसरे रौप्य पदक मिळवून दिले आहे. तसेच शनिवारी (७ ऑगस्ट) कुस्तीपटू बजरंग पुनियाने कांस्यपदक जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जय बजरंगा! टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पूनियाने मिळवून दिले कुस्तीतील दुसरे पदक
ऐतिहासिक सामन्यासाठी नीरज करतोय ‘अशी’ तयारी, व्हिडिओ झाला व्हायरल
ऑसी गोलंदाजाने टी२० पदार्पणातच केला हॅट्रिकचा कारनामा, तरीही संघ बांगलादेशविरुद्ध पराभूत