भारतीय १९ वर्षाखालील संघाने शनिवारी (२९ जानेवारी) बांगलादेश (india under 19 vs Bangladesh under 19) संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. २०२० मध्ये झालेल्या आयसीसी १९ (icc under 19 world cup) वर्षाखालील स्पर्धेत बांगलादेश संघाने अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरले होते. आता भारतीय संघाने या पराभवाचा बदला घेतला आहे. यासह स्पर्धेत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. दरम्यान विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत ९ वेळेस उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्यांना ७ वेळेस विजय मिळवण्यात यश आले आहे. हा विजय भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा होता. कारण बांगलादेश संघाने गेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्न तोडले होते.
विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचे जोरदार सेलिब्रेशन
भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी ११२ धावांची आवश्यकता होती. शेवटी कर्णधार यश धूल (Yash dhull) आणि कौशल तांबे (Kaushal tambe) यांची जोडी मैदानावर होती. त्यावेळी ३१ वे षटक टाकण्यासाठी रकिबुल हसन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर कौशल तांबेने स्टेप आऊट होऊन लाँग ऑनच्या वरून मॅच विनिंग षटकार मारला आणि भारतीय संघाला जोरदार विजय मिळवून दिला. या विजयानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले होते.
कौशलनेही सामना विजयानंतर मैदानावरील स्टंप हाती घेत एमएस धोनीची आठवण करून दिली. सर्व खेळाडू एकमेकांना मिठी मारून विजयाच्या शुभेच्छा देऊ लागले. तसेच भारतीय संघाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
भारतीय संघाचा जोरदार विजय
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाला अवघ्या १११ धावा करण्यात यश आले होते. बांगलादेश संघाकडून मेहरोबने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून धावांचा पाठलाग करताना अंगक्रिश रघुवंशीने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. हे आव्हान भारतीय संघाने ३१ व्या षटकात पूर्ण केले.
महत्वाच्या बातम्या :
रवी कुमारच्या जादुई चेंडूने फलंदाजही बुचकळ्यात, काही कळायच्या आतच उडून पडल्या दांड्या- VIDEO
एक अविस्मणीय क्रिकेट सामना! ४५ धावांवर बाद होऊनही इंग्लंडने मिळवला होता शानदार कसोटी विजय
हे नक्की पाहा: