भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी२० सामना गुरुवारी (१७ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने ८ धावांनी विजय मिळत ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता २० मार्चला होणारा पाचवा सामना निर्णायक असेल.
चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडला १८६ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकात ८ बाद १७७ धावा करता आल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या आणि राहुल चाहरने प्रत्येकी २ विकेट्स आणि भुवनेश्वर कुमारने १ विकेट घेतली.
इंग्लंडने १३ षटकात १०० धावा केल्यानंतर बेन स्टोक्सने आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, त्याला साथ देणारा जॉनी बेअरस्टो १९ चेंडूत २५ धावा करुन १५ व्या षटकात राहुल चाहरच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतरही स्टोक्सने त्याचा खेळ सुरु ठेवला होता. मात्र शार्दुल ठाकूरने टाकलेले १७ वे षटक महत्त्वाचे ठरले. या षटकात त्याने लागोपाठच्या चेंडूवर बेन स्टोक्स आणि ओएन मॉर्गन यांना बाद केले. स्टोक्स २३ चेंडूत ४६ धावा करुन बाद झाला. तर मॉर्गन ४ धावांवर बाद झाला. १८ व्या षटकात सॅम करनला हार्दिक पंड्याने त्रिफळाचीत करत भारताचे काम अधिक सोपे केले. त्यामुळे इंग्लंडची अवस्था १८ षटकात ७ बाद १५३ धावा अशी झाली.
पण यानंतर अखेरच्या षटकात २३ धावांची गरज असताना शार्दुल ठाकूरने टाकलेल्या या षटकात पहिल्या तीन चेंडूत जोफ्रा आर्चरने १० धावा काढल्या. त्यानंतर २ चेंडू वाईड गेल्याने सामना रंगतदार अवस्थेत आला. पण त्यानंतर आर्चरला एकच धाव घेता आली. पाचव्या चेंडूवर ख्रिस जॉर्डन बाद झाला. अखेरच्या चेंडूवर आर्चरला एकही धाव घेता आली नाही. त्यामुळे अखेर भारताने सामना जिंकला.
इंग्लंडच्या १३ षटकात १०० धावा
इंग्लंडने पहिल्या १३ षटकात ३ बाद १०० धावा केल्या आहेत. इंग्लंडला ४२ चेंडूत ८६ धावांची गरज आहे. इंग्लंडकडून सलामीवीर जेसन रॉय आणि जोस बटलरने चांगली सुरुवात केली होती. मात्र बटलर ९ धावा करुन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर तिसऱ्या षटकात बाद झाला. त्याच्यानंतर जेसन रॉय आणि डेव्हिड मलान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र मलानला ८ व्या षटकात राहुल चाहरने त्रिफळाचीत करत पहिली आंतरराष्ट्रीय टी२०मधील विकेट मिळवली.
यानंतर पुढच्याच षटकात जेसन रॉय ४० धावा करुन हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल सुर्यकुमारने घेतला. तीन विकेट्स १० षटकांच्या आत गेल्यानंतर बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोने इंग्लंडचा डाव संभाळला. त्यांनी १३ षटकांपर्यंत इंग्लंडला १०० धावांचा आकडा गाठून दिला.
भारताच्या ८ बाद १८५ धावा
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. मात्र भारताचे वरच्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाले. पण त्यानंतर सुर्यकुमार यादवने अर्धशतक पूर्ण केले. तसेच श्रेयस अय्यरने आक्रमक खेळ केला. त्यामुळे भारताला २० षटकात ८ बाद १८५ धावा करता आल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. भारताने इंग्लंडला १८६ धावांचे आव्हान दिले आहे.
पहिल्या १२ षटकात ९० धावांचा आकडा पार केल्यानंतर सुर्यकुमार १४ व्या षटकात ५७ धावांवर सॅम करनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल डेव्हिड मलानने घेतला. या झेल वादग्रस्त ठरला आहे. कारण मलानने हा झेल घेतला, पण त्यानंतर चेंडू जमीनीला टेकला की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला. यावेळी रिव्ह्यू पाहाण्यात आला मात्र पंचांनी सॉफ्ट सिग्नल बाद दिलेला असल्याने सुर्यकुमारला विकेट गमवावी लागली.
त्याच्या विकेटनंतर रिषभ पंत १७ व्या षटकार २३ चेंडूत ३० धावा करुन बाद झाला. त्याला जोफ्रा आर्चरने त्रिफळाचीत केले. दरम्यान हार्दिक पंड्या आणि श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी केली. पण हार्दिक १९ व्या षटकात ११ धावांवर मार्क वूडच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा अफलातून झेल बेन स्टोक्सने घेतला.
पाठोपाठ २० व्या षटकात भारताने २ विकेट्स गमावल्या. श्रेयस अय्यर १८ चेंडूत ३७ धावा करुन जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर वॉशिंग्टन सुंदर ४ धावांवर बाद झाला. त्याचा झेलही वादग्रस्त ठरला. त्याचा झेल जेव्हा आदिल राशिदने घेतला तेव्हा त्याचा पाय बाऊंड्री लाईनला लागला की नाही याबाबत गोंधळ झाला. अखेर सॉफ्ट सिंग्नल बाद असल्याने त्यालाही बाद देण्यात आले.
वरच्या फळीचे अपयश, तर सुर्यकुमारते अर्धशतक
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला. त्याची विकेट जोफ्रा आर्चरने चौथ्या षटकात स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत मिळवली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सुर्यकुमार यादवला बढती देण्यात आली. त्याने केएल राहुलची चांगली साथ देण्यास सुरुवात केली. मात्र या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावा जोडल्यानंतर ८ व्या षटकात केएल राहुलला १४ धावांवर बेन स्टोक्सने बाद केले.
त्यापाठोपाठ भारताचा कर्णधार विराट कोहली आदिल राशिद विरुद्ध खेळताना ९ व्या षटकात १ धावेवर यष्टीचीत झाला. पण त्यानंतर सुर्यकुमारने त्याच्या फलंदाजीवर परिणाम न होऊ देता २८ चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याला रिषभ पंत चांगली साथ देत आहे,
भारताने १२ षटकात ३ बाद ९२ धावा केल्या आहेत. सुर्यकुमार ५० धावांवर आणि रिषभ पंत ७ धावांवर खेळत आहे.
इंग्लंडने जिंकली नाणेफेक
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. युझवेंद्र चहलच्या जागी राहुल चहरला संधी देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. तर इशान किशनला दुखापत झाल्याने त्याला संघातून वगळावे लागले आहे. त्यामुळे त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. त्याचवेळी मागील सामना जिंकणाऱ्या इंग्लंडच्या संघात मात्र कोणतेही बदल करण्यात आले नाहीयेत.
भारतीय संघ –
रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, राहुल चहर.
इंग्लंड संघ –
जेसन रॉय, जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मालन, जॉनी बेअरस्टो, इयोन मॉर्गन (कर्णधार), बेन स्टोक्स, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.