इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत अफगाणिस्तान संघाचे अनेक खेळाडू खेळत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिग्गज फिरकीपटू राशिद खान होय. राशिद आयपीएल 2023 स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यात सर्वाधिक 19 विकेट्स नावावर केल्या आहेत. अशात त्याने त्याच्या देशातील फिरकीपटूंविषयी मोठा खुलासा केला आहे. राशिद नेमकं काय म्हणालाय, तेच आपण जाणून घेऊयात…
राशिद खान (Rashid Khan) याने मोठा खुलासा करत म्हटले की, अफगाणिस्तानात 1000हून अधिक फिरकीपटू (Over 1000 Spinners in Afghanistan) आहेत. राशिदनुसार अफगाणिस्तानमध्ये फिरकीपटू त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. राशिदने हे वक्तव्य राजस्थान रॉयल्सविरुद्ध केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर केले.
‘अफगाणिस्तानमध्ये लेग स्पिनर्सची कमी नाही’
सामन्यानंतर राशिद खान याला अफगाणिस्तानमधील फिरकीपटूंबाबत विचारणा केली. यावेळी उत्तर देताना तो म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगतो, 1000पेक्षा जास्त लेग स्पिनर्स अजूनही आहेत. मी एका अकादमीमध्ये गेलो होतो आणि तिथे खूप सारे लेग स्पिनर होते. माझ्या पहिल्या आयपीएल हंगामानंतर 250 लेग स्पिनर होते. आता मला आयपीएलमध्ये खेळताना 6-7 वर्षे झाले आहेत. तसेच, अनेक फिरकीपटू अफगाणिस्तानमध्ये माझे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. मला दरदिवशी अनेक लेग स्पिनर्सचा व्हिडिओ मिळतो. मला खूप आनंद होतो की, नूर अहमद इथे चांगली कामगिरी करत आहे. त्याच्याव्यतिरिक्त कैस अहमद आणि जाहिर खानही आहे, ज्यांना अद्याप आयपीएलमध्ये संधी मिळाली नाहीये. या खेळाडूंकडेही खूप प्रतिभा आहे.”
राशिदव्यतिरिक्त आयपीएलमध्ये ‘हे’ अफगाणी खेळाडू
राशिद खान याच्याव्यतिरिक्त आयपीएलमध्ये अफगाणिस्तानचा आणखी एक फिरकीपटू नूर अहमद (Noor Ahmad) हादेखील खेळत आहे. दोघेही खेळाडू गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा भाग आहेत. राशिदप्रमाणेच नूरदेखील फलंदाजांना अडचणीत टाकण्याचे काम करतो. राशिद आणि नूर यांनी राजस्थानविरुद्ध जयपूरमध्ये खेळलेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. राशिदने 4 षटकात फक्त 14 धावा खर्च करत 3 विकेट्स घेतल्या होत्या, तर नूर अहमदनेही 3 षटकात 25 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. या दोघांच्या फिरकीपुढे राजस्थान संघाच्या फलंदाजांना गुडघे टेकावे लागले. तसेच, गुजरातने हा सामना 9 विकेट्सने जिंकला होता. (ipl 2023 afghanistan have more than 1000 leg spinners now rashid khan statement)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एक-एक धावेसाठी तरसणाऱ्या रोहितसाठी शास्त्रींचा खास संदेश, म्हणाले, ‘अजून हंगाम संपला नाही…’
बिग ब्रेकिंग! WTC फायनलसाठी टीम इंडियातून केएल राहुलचा पत्ता कट, ‘या’ खेळाडूला मिळाली संधी