कोरोना व्हायरसमुळे आशिया चषक आणि टी२० विश्वचषक स्पर्धा रद्द करण्यात आले आहेत. परंतु एक आनंदाची बातमीदेखील आहे. लॉकडाऊनमुळे मागील ४ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर राहणाऱ्या चाहत्यांचा आनंद पुन्हा प्रफुल्लित होणार आहे. आयपीएल आपल्या १३व्या मोसमासोबत पुनरागमन करत आहे. तरीही मागील मोसमाच्या तुलनेत यावेळी बरेच बदल पहायला मिळतील. आयपीएल दुसऱ्यांदा युएईमध्ये होणार आहे. परंतु याचे आयोजन कसे होईल, हे सुरक्षित असेल का? अशा चर्चांना उधान आले आहे.
आधी आयपीएलचे वेळापत्रक काय होते?
– बीसीसीआयने आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे आयोजन २९ मार्च ते २४ मेदरम्यान करण्याचे ठरविले होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे आयोजन पुढे ढकलण्यात आले.
– त्यानंतर मुंबई आणि त्याच्या जवळपासच्या भागातील मैदानावर प्रेक्षकांविना आयपीएल सामने आयोजित केले जाऊ शकतात, असे म्हटले जात होते. परंतु महाराष्ट्रात वेगाने वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे हेदेखील टाळण्यात आले.
– आशिया चषक आणि टी२० विश्वचषक स्पर्धांचे आयोजन होणार होते. परंतु कोरोनाचा धोका पाहता आयसीसीने हेदेखील रद्द केले. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाचे मार्ग खुले झाले आहे.
कधी होतील सामने?
– आशिया चषक आणि टी२० विश्वचषक रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला ८ आठवड्यांचा कालावधी (विंडो) मिळाला आहे. यादरम्यान आयपीएलचे आयोजन केले जाणार आहे.
– आता आयपीएल २०२० चा मोसम १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान युएईमध्ये होणार असल्याची पुष्टी आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली आहे. ५१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघ १४- १४ सामने खेळणार आहे. अशाप्रकारे एकूण ६० सामने खेळण्यात येणार आहेत.
– सामना ७.३० वाजता सुरू होणार आहे. भारतात हे सामने ८ वाजता सुरू होत असायचे. ७.३० वाजता नाणेफेक व्हायची. यावेळी आयपीएल यूएईमध्ये असल्यामुळे सामन्यांच्या वेळामध्ये बदल केले जाणार आहेत.
– आयपीएलचे अध्यक्ष पटेल यांनी सांगितले की सप्टेंबर- ऑक्टोबरदरम्यान आयपीएलच्या १३ व्या मोसमाचे आयोजन होणार आहे. तरीही, भारत सरकारने याबाबत कोणतीही परवानगी दिलेली नाही.
युएईमध्येच आयपीएलचे आयोजन का?
– भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत असल्यामुळे आयपीएलचे आयोजन भारतात होणार नाही. त्यामुळे आयपीएलचे आयोजन युएईमध्ये केले जात आहे. यापूर्वी आयपीएल २०१४मध्ये युएईमध्ये आयोजित केले होते. त्यावेळी भारतात लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या. त्यामुळे आयपीएलचे २० सामने युएईमध्ये खेळण्यात आले होते.
– युएईमध्ये आयपीएलसाठी दुबई, अबू धाबी आणि शारजाह हे तीन मुख्य ठिकाणे असतील, जिथे सामने होणार आहेत.
– बीसीसीआय हे तिन्ही ठिकाणे भाड्याने घेत आहे. इथे बसमार्फत पोहोचता येईल. प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी विमान प्रवासाची आवश्यकता नाही. आयसीसी अकादमी ग्राऊंडही ट्रेनिंगसाठी उपलब्ध आहे. अबू धाबीच्या शेख क्रिकेट स्टेडिअममध्ये २०१४ साली आयपीएलचे सामने भरवले होते.
युएईमध्ये आयपीएल सुरक्षित आहे का?
– भारतात दिवसेंदिवस कोरोनाची प्रकरणेे वाढत आहेत. भारताच्या तुलनेत युएईमध्ये कोरोनाची प्रकरणे कमी आहेत.
– युएईने ७ जुलैला आपल्या सीमा पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. १५ दिवसांसाठी क्वारंटाईन होण्याचीही आवश्यकता नाही. प्रत्येक व्यक्तीला निगेटिव्ह कोरोना चाचणी अहवाल दाखविल्यानंतर प्रवेश मिळत आहे.
– भारतीय खेळाडूंनी मार्च महिन्यानंतर कोणताही सामना खेळलेला नाही. त्यामुळे एका महिन्याचा ट्रेनिंग शिबिर आवश्यक आहे. क्वारंटाईन आवश्यक नसल्यामुळे हा भारतीय खेळाडूंसाठी चांगले ठिकाण सिद्ध होईल.
– इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल सुरू झाल्यानंतर जोडले जाऊ शकतात.
पूर्वीपेक्षा किती वेगळे असेल यावर्षीचा आयपीएल?
– प्रेक्षकांशिवाय घेण्याच्या निर्णयाबद्दल पटेल यांनी सांगितले की हे यूएई सरकारवर अवलंबून असेल.
– सामन्यादरम्यान स्टेडिअममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीच्या आधारे हे निश्चित होईल की, चीयरलीडर यांचा समावेश असेल की नाही. आतापर्यंत आयपीएलमध्ये चीयरलीडर्सचे मोठे आकर्षण राहिले आहे. पहिल्यांदा त्यांच्या अनुपस्थितीत सामन्यांचे आयोजन होऊ शकते.
– जुने वेळापत्रकात ४४ दिवसात ६० सामन्यांचे आयोजन केले जात होते. परंतु यावेळी ५१ दिवसांचा कालावधी मिळाला आहे. पहिल्या ५ रविवारी २-२ सामने आयोजित केले जात होते. परंतु आता केवळ ५ दिवस डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने खेळले जातील.
– संघांना रणनीती बनविण्यासाठी २ मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाईम- आऊट मिळायचा. परंतु यावेळी असे काही असेल की नाही हे सांगितले जाऊ शकत नाही. तसं पाहिलं तर याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.