जवळपास 10 महिन्यांपासून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टी20 क्रिकेट खेळले नाहीयेत. त्यांच्या जागी भारतीय संघात युवा खेळाडूंना खेळवले जात आहे. त्यांच्या वयामुळे त्यांना टी20 क्रिकेट संघात खेळवले जात नाही, असे म्हटले जात आहे. रोहित 36 वर्षांचा आहे, तर विराट नोव्हेंबरमध्ये वयाची 35 वर्षे पूर्ण करतोय. अशात इंग्लंडचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार जो रूट याने रोहित आणि विराटविषयी मोठे विधान केले आहे.
जो रूट (Joe Root) याला वाटते की, क्रिकेटमध्ये वय हा निर्णायक घटक नसला पाहिजे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांसारखे स्टार खेळाडू त्यांच्या वयाच्या आधारे त्यांच्या कारकीर्दीच्या शेवटाकडे जात आहेत, असे मानणे धोकादायक असल्याचेही रूटला वाटते.
काय म्हणाला रूट?
आघाडीचे वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रूटने रोहित आणि विराट यांच्या टी20 क्रिकेटविषयी चर्चा केली. रूटला यावेळी प्रश्न विचारण्यात आला होता की, वनडे विश्वचषक भारतात खेळला जाणार आहे आणि टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) पुढील वर्षी, तर रोहित आणि विराट यांनी वनडे आणि कसोटीवर लक्ष केंद्रित करून युवा खेळाडूंचा 2024च्या टी20 विश्वचषकासाठी मार्ग मोकळा करावा का?
या प्रश्नाचे उत्तर देताना रूट म्हणाला, “माझ्या मते, विराट आणि रोहितसारख्या खेळाडूंना त्यांच्या वयामुळे संघातून काढून टाकणे खूपच धोकादायक आहे. उदाहरणार्थ, ख्रिस गेलकडे पाहा तो किती काळ टी20 क्रिकेट खेळला. जगातील काही सर्वोत्तम खेळाडू दीर्घ काळ खेळले. विशेषत: टी20 क्रिकेटमधील त्यांची कामगिरीही शानदार आहे. जोपर्यंत तुम्ही तंदुरूस्त असाल, तोपर्यंत तुम्ही पुढे जात खेळले पाहिजे.”
रूटच्या मते, “कारकीर्द संपण्याची वेळ आली आहे का? जेव्हा तुम्ही हे पाहण्यास सुरू करता, तेव्हा हे धोकादायक असते. मला वाटते की, तुम्ही कामगिरी आणि ते संघात काय घेऊन येतात, हे पाहावे लागेल.”
रूटला असेही विचारण्यात आले की, भारतीय संघात रोहित आणि विराटच्या जागी खेळाडू शोधणे कठीण असेल. तुझ्या डोक्यात कोणते युवा खेळाडू आहेत? यावर रूट म्हणाला की, “याचे उत्तर देणे खूपच कठीण आहे. त्याविषयी मला बोलायचे नाही. हे दोघेही सर्व क्रिकेट प्रकारातील अप्रतिम खेळाडू आहेत, आघाडीचे खेळाडू आहेत. त्यांना अनेक वर्षांपासून दबाव सहन करावा लागला आहे. जेव्हा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचा विचार येतो, तेव्हा ते कामगिरी करण्यात किती सातत्यपूर्ण आहेत, हे नक्कीच प्रभावी आहे. तुम्हाला माहिती आहे की, एक सहकारी व्यावसायिक म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहता, त्यांच्या खेळातून शिकण्यास आणि धडे घेण्याचे पाहता.”
खरं तर, भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ‘रनमशीन’ विराट कोहली सध्या आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत खेळत आहेत. रोहित 4 सामन्यात 194 धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी आहे. भारतीय संघ 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेसाठी आशिया चषकात तयारी करत आहेत. (Joe Root on Virat Kohli and Rohit Sharma said Dangerous to write off players like based on their age know more)
हेही वाचा-
‘हा विजय माझ्यासाठी पाकिस्तानपेक्षाही मोठा…’, श्रीलंकेच्या नांग्या ठेचल्यानंतर असे का म्हणाला गंभीर?
गंभीरच्या मुखातून MS Dhoniचे तोंडभरून कौतुक; ‘हिटमॅन’चे नाव घेत म्हणाला, ‘धोनीमुळेच आज रोहित शर्मा…’