इंग्लंड क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेयरस्टोला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) वार्षिक कसोटी क्रिकेट करारातून मुक्त केले आहे. ओली पोप, झॅक क्रॉली आणि डोम सिब्ली यांनी केलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल त्यांचा या करारात समावेश केला गेला आहे.
बेयरस्टोचे या करारातून बाहेर होणे सर्वांनाच अनपेक्षित होत. कारण 31 वर्षीय बेयरस्टो 2019 पासून झालेल्या 12 कसोटी सामन्यांपैकी फक्त एक सामना खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पहिले शतक ठोकल्यानंतर पोप, क्रॉली आणि सिब्ली यांचा या करारात समावेश करून ईसीबीने एकप्रकारे त्यांचा सन्मान केला आहे.
याबरोबरच इंग्लंडकडून अॅशेस मालिकेत मोलाची कामगिरी बजावणारा वेगवान गोलंदाज मार्क वूड यालाही केवळ वनडे आणि टी20 क्रिकेट करारात स्थान दिले आहे. तसेच जो रूट, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वॉक्स या खेळाडूंचा कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही क्रिकेट प्रकारच्या वार्षिक कराराच्या यादीत समावेश समावेश करण्यात आला आहे.
2019-2020 च्या हंगामानुसार,कसोटी क्रिकेटचा करार 650000 पाउंड इतक्या किमतीचा असल्याचे समजते तर वनडे आणि टी20 कराराची किंमत 275000 पाउंड आहे. कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे यावर्षीही इतकीच किंमत मिळेल याबाबत शंका आहे.
कोव्हिड-19 रोगाच्या महामारीमुळे जगभरात क्रिकेट सामने होऊ शकले नाही. यामुळे इसीबीलाही 100 दशलक्ष पाउंड किमतीचा फटका बसला आहे. सध्या बोर्डाची आर्थिक स्थिती चांगली नाही.
2020-2021 या वर्षासाठी करारात समाविष्ट केलेल्या खेळाडूंची यादी:
कसोटी, टी20 आणि वनडे क्रिकेट: जोफ्रा आर्चर, जॉस बटलर, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस वॉक्स.
फक्त कसोटी क्रिकेट: जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॉली, ओली पोप, डोम सिब्ली, सॅम करन.
वनडे आणि टी20: मोईन अली, जॉनी बेयरस्टो, टॉम करन, एऑन मॉर्गन, आदिल राशिद, जेसन रॉय, मार्क वुड.