मापुसा ( गोवा), २८ जानेवारी २०२४ : जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या फेलिक्स लेब्रुन आणि चायनीज तैपेईच्या चेंग आय-चिंग यांनी वर्ल्ड टेबल टेनिस स्टार कंडेंटर गोवा २०२४ मध्ये आपापल्या गटात एकेरिचे जेतेपद नावावर केले. रविवारी गोव्यातील मापुसा येथील पेडेम इनडोअर स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवला गेला.
लेब्रुनने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पहिले दोन गेम गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले आणि जागतिक क्रमवारीत ७व्या स्थानावर असलेल्या ह्युगो कॅल्डेरानोचा ४-२ ( ९-११, ९-११, १३-११, ११-०, १५-१३, ११-७) असा पराभव केला. ब्राझीलच्या खेळाडूने स्पर्धेची सुरुवात सकारात्मक पद्धतीने केली, परंतु तिसऱ्या गेममध्ये लेब्रुनने पुनरागमन केले. हा गेम अटीतटीचा झाला, परंतु यानंतर लेब्रुनने दमदार विजय मिळवून जेतेपद नावावर केले.
१७ वर्षीय खेळाडूने चौथ्या गेममध्ये दमदार बचावात्मक खेळ करून प्रतिस्पर्ध्याला एकही गुण मिळवू दिला नाही. लेब्रुनने पुढच्या दोन गेममध्ये आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवण्यासाठी उल्लेखनीय खेळ केला.
दरम्यान, महिला एकेरीच्या अंतिम फेरीत गत उपविजेतेपदी चेंग आय-चिंगने जर्मनीच्या नीना मित्तेलहॅमचा पराभव केला. चायनीज तैपेई खेळाडूने सुरुवातीपासूनच सामन्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले आणि मिटेलहॅमचा ४-० ( ११-८ , ११-८, १७-१५, ११-६ ) असा सरळ सेटमध्ये पराभव करून स्पर्धेतील विजेतेपद पटकावले.
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या मार्गदर्शनाखाली स्तूपा स्पोर्ट्स ॲनालिटिक्स आणि अल्टिमेट टेबल टेनिस द्वारे आयोजित. ४१ हून अधिक भारतीय पॅडलर्सने स्पर्धेत भाग घेतला, जे डब्ल्यूटीटी इव्हेंटमध्ये देशाचे सर्वोच्च प्रतिनिधित्व आहे. युवा भारतीय पॅडलर श्रीजा अकुलाचा एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश हा भारतासाठी सर्वोत्तम निकाल ठरला.
तत्पूर्वी, दक्षिण कोरियाच्या शिन युबिन आणि लिम जोंगून यांनी चमकदार खेळ करत मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या अल्वारो रोबल्स आणि मारिया जिओ यांचा ३-० ( ११-२, १२-१०, १३-११ ) असा पराभव करून विजेतेपद निश्चित केले.