सध्या भारतात वनडे विश्वचषक खेळला जात आहे. भारतातील दहा शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडतेय . असे असले तरी, याच दरम्यान भारतीय क्रिकेटचा देशांतर्गत हंगाम देखील खेळला जाईल. देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही स्पर्धा देखील यादरम्यान पार पडेल. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची घोषणा करण्यात आली असून, संघाचे नेतृत्व अनुभवी केदार जाधव याच्याकडे देण्यात आले आहे. ही स्पर्धा 16 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या काळात पार पडेल.
या स्पर्धेसाठी घोषित केलेल्या महाराष्ट्र संघात अनुभवी व युवा खेळाडूंचा योग्य समन्वय साधल्याचे दिसते. या हंगामातून पुन्हा एकदा पुनरागमन करत असलेल्या अनुभवी केदार जाधवकडे संघाचे नेतृत्व दिले गेले आहे. यासोबतच सध्या एशियन गेम्समध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला ऋतुराज गायकवाड संघाचा भाग असेल. याव्यतिरिक्त अनुभवी अंकित बावणे, प्रदीप दाढे, सत्यजित बच्छाव व अजीम काझी हे संघातील आपली जागा राखण्यात यशस्वी ठरले. राहुल त्रिपाठी याला मात्र संघात संधी मिळालेली नाही.
जून महिन्यात खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना देखील संघात जागा मिळाली आहे. ती स्पर्धा गाजवलेले अर्शिन कुलकर्णी, विजय पावले, धनराज शिंदे व ऋषभ राठोड हे संघात असतील.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघ: केदार जाधव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, प्रदीप दाढे, सत्यजित बच्छाव, अजीम काझी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, विजय पावले, धनराज शिंदे, ऋषभ राठोड, मंदार भंडारी, सिद्धार्थ म्हात्रे, प्रशांत सोळंकी, विकी ओस्तवाल व निखिल नाईक.
राखीव- पियुष साळवी, रोशन वाघसरे, हितेश वाळुंज, प्रितम पाटील व तरणजीत धिलॉन.
(Maharashtra Annouced Squad For Syed Mushtaq Ali Trophy Kedar Jadhav Lead)
महत्वाच्या बातम्या –
दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिरडत अफगाणिस्तानचा जबरदस्त विजय, अंतिम सामन्यात ऋतुराजसेनेशी भिडणार
विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने जिंकला टॉस; बाबर म्हणाला, ‘आम्ही आज 300…’