भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी२० मालिका शुक्रवारपासून (१२ मार्च) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकला होता. या सामन्यातील भारतीय खेळाडूंच्या खराब कामगिरीनंतर माजी इंग्लंड दिग्गज मायकल वॉन यांनी भारतीय संघावर निशाणा साधला होता. त्यानंतर भारताने नुकताच पार पडलेला दुसरा टी२० सामना ७ विकेट्सने जिंकत मालिकेत दमदार पुनरागमन केले. तरीही वॉन यांनी पुन्हा त्याच मुद्द्यावरुन भारतीय संघावर टीका केली आहे.
त्याचे झाले असे की, पहिल्या टी२० सामन्यात भारतीय फलंदाजांना खास प्रदर्शन करता आले नव्हते. या सामन्यात भारताने २० षटकात ७ विकेट्स गमावत अवघ्या १२४ धावा केल्या होत्या. यानंतर वॉननी ट्विटरद्वारे भारतीय संघाची थट्टा केली होती. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘टी२० क्रिकेट स्वरुपातील आयपीएलचा मुंबई इंडियन्स संघदेखील भारतीय संघापेक्षा जास्त चांगला आहे.’
The @mipaltan are a better T20 team than @BCCI !!! #JustSaying #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 12, 2021
यावर माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी वॉनला खरीखोटी सुनावली होती. त्यांनी वॉनच्या ट्विटला प्रत्युत्तर देत लिहिले होते की, ‘सर्व संघ तुमच्याइतके भाग्यशाली नसतात मायकल, जे ४ परदेशी खेळाडूंना घेऊन खेळतात.’
Not all teams are lucky enough to play four overseas players Michael😏 #INDvENG https://t.co/sTmGJLrNFt
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) March 12, 2021
यानंतर भारतीय संघाने मागील पराभवाचा वचपा काढत दुसऱ्या टी२० सामन्यात शानदार विजय मिळवला. भारताच्या या विजयात पदार्पणवीर इशान किशनने महत्त्वाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, इशान हा आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख खेळाडू आहे. याच मुद्द्यावरुन वॉन यांनी पुन्हा भारतीय संघाची खोड काढली आहे.
त्यांनी परत ट्विट करत लिहिले आहे की, ‘मी आधीच सांगितले होते मुंबई इंडियन्सचा संघ भारतीय संघापेक्षा चांगला आहे.’
Told you all the @mipaltan were better than India … What a debut @ishankishan51 !! #INDvsENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) March 14, 2021
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. यात सलामीवीर जेसन रॉयच्या सर्वाधिक ४६ धावांचा समावेश होता. ३५ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकार मारत त्याने ही धावसंख्या केली होती. भारताकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स चटाकवल्या.
प्रत्युत्तरादाखल भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याने ४९ चेंडू खेळले आणि ३ षटकार व ५ चौकार मारले. त्याच्याबरोबर इशान किशननेही ३२ चेंडूत ५२ धावांनी अफलातून खेळी केली. यासह भारताने १७.५ षटकातच ३ विकेट्स गमावत इंग्लंडचे आव्हान पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
ज्यूनियर इरफान सचिनसोबत सलामीला फलंदाजीस सज्ज! पाहा क्यूट फोटो
INDvENG: पदार्पणवीर इशानने पूर्ण केले भारताचे ‘मिशन’, सेहवागला आठवला झारखंडचा ‘महान शिलेदार’
दुसऱ्या टी२०त पाहुण्यांचा दारुण पराभव; इंग्लंडच्या संघनायकाने ‘यांच्यावर’ फोडले पराभवाचे खापर