सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला खेळला गेलेला एकमेव कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर उभय संघांमध्ये वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या सामन्यात अर्धशतक ठोकणारी भारतीय संघाची कर्णधार मिताली राज हिला फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये फायदा झाला असून, ती अव्वल पाचमध्ये सामील झाली आहे.
पहिल्या सामन्यात मितालीने ठोकले झुंजार अर्धशतक
एकमेव कसोटीत सपशेल अपयशी ठरल्यानंतर मिताली राज वनडे मालिकेच्या पहिल्याच सामन्यामध्ये फॉर्ममध्ये असल्याचे दिसली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरताना तीने ७२ धावांची दमदार खेळी केली. तिच्या या खेळीनंतर ही भारतीय संघ २०१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडने केवळ दोन गडी गमावून आरामात पार केले.
मितालीची क्रमवारीत झेप
इंग्लंड विरुद्ध भारत पहिल्या वनडेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीमध्ये या सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या मिताली राजला फायदा झाला. तिने तीन स्थानांची प्रगती करत पाचवे स्थान पटकावले. ३८ वर्षीय मिताली २०१९ नंतर प्रथम आज पहिल्या पाच फलंदाजांमध्ये आली आहे. मितालीने नुकतीच आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला २२ वर्ष पूर्ण केली आहेत.
‘या’ खेळाडूंना देखील झाला फायदा
इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी सामनावीर टॅमी ब्यूमॉन्ट तिने आपले अव्वल स्थान भक्कम केले. या सामन्यात नाबाद ७४ दावा करणारी इंग्लंडची अनुभवी फलंदाज नतालिया सीवर एका स्थानाच्या प्रगतीसह आठव्या क्रमांकावर विराजमान झाली. भारताची युवा अष्टपैलू पूजा वस्त्रकारने फलंदाजांच्या क्रमवारीत ९७ तर, गोलंदाजांच्या क्रमवारीत ८८ वा क्रमांक पटकावला. भारताची धडाकेबाज सलामीवीर शेफाली वर्मा हिने कारकीर्दीची सुरुवात १२० व्या क्रमांकावरून केली. तिने या सामन्यात १५ धावा बनविल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या:
एकमेवाद्वितीय! आजच्याच दिवशी चौदा वर्षांपूर्वी सचिन ठरला होता ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू
पदार्पणातच द्विशतक झळकलेल्या किवी फलंदाजाला लागणार लॉटरी? ‘हे’ आयपीएल संघ खरेदीसाठी उत्सुक