Mohammed Shami Drop Catch: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यासाठी त्याचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमीच आहे. सुरुवातीला शमी न्यूझीलंडच्या फलंदाजांशी एकटा लढताना दिसला. त्याने न्यूझीलंडच्या अव्वल 5 फलंदाजांना एकट्याने तंबूचा रस्ता दाखवला. तसेच, आणखी 2 विकेट्स घेत संघाला 70 धावांनी विजयी तर केलेच, पण त्यासोबतच अंतिम सामन्याचे तिकीटही मिळवून दिले. मात्र, सामन्यादरम्यान एक क्षण असाही होता, जेव्हा शमी क्रिकेटप्रेमींसाठी व्हिलन बनला होता. त्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 4 विकेट्स गमावत 397 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) आणि अनुभवी फलंदाज डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) हे टिच्चून फलंदाजी करत होते. लाख प्रयत्न करूनही भारतीय संघाला विकेट मिळत नव्हती. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबतच संपूर्ण भारतीय संघ चिंतेत होता.
याचदरम्यान आशेचा किरण बनून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मैदानावर आला. डावाच्या 29व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने विकेटची संधी साधली होती, पण विलियम्सनचा सोपा झेल मिड ऑनवर मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्या हातून निसटला. हा खेळाडूंसोबतच चाहत्यांसाठीही धक्का होता. कारण, सामन्यात न्यूझीलंडने मजबूत पकड बनवली होती. अशात हा झेल सुटणे जोखमीचे होते. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ स्वत: आयसीसीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/Czq9g-LItR5/?utm_source=ig_embed&ig_rid=4468b1ac-bb23-48d9-aef9-0b43dfdd4a96
शमीनेच करून दिले दमदार पुनरागमन
शमीने आपल्या चुकीची भरपाईदेखील केली. त्याने 33व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर विलियम्सनला तंबूत धाडले. तो 69 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर याच षटकातील चौथ्या चेंडूवर टॉम लॅथम यालाही पायचीत बाद करत भारताला पुनरागमन करून दिले. सामन्यादरम्यान त्याने उल्लेखनीय प्रदर्शन केले. त्याने 9.5 षटके गोलंदाजी करताना 5.79च्या इकॉनॉमीने 57 धावा खर्च करत सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. (mohammed shami kane williamson drop catch jasprit bumrah india vs new zealand semi final odi world cup 2023 see video)
हेही वाचा-
SA vs AUS Semi Final 2: रोहितसेनेशी Finalमध्ये भिडण्यासाठी कोलकात्यात रंगणार महायुद्ध, पाहा Playing XI
‘मी तसे करायला नको होते…’, विश्वविक्रमी गोलंदाजी प्रदर्शनानंतर असे का म्हणाला शमी? लगेच वाचा