दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) संघात सध्या ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांनंतर या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. आता केपटाऊन येथे होणारा तिसरा सामना निर्णायक सामना असणार आहे. असे असतानाच भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर येत आहे.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj) तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडू शकतो. जोहान्सबर्ग येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. त्याला संपूर्ण सामन्यात १५.५ षटकेच गोलंदाजी करता आली होती. तसेच दुसऱ्या डावात तर त्याने केवळ ६ षटके गोलंदाजी केली होती. या दुखापतीतून तो अद्याप सावरला नसल्याचे राहुल द्रविडने दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर सांगितले होते.
द्रविड म्हणाला होता, ‘सिराज अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. आम्हाला पुढे जाऊन त्याच्या तंदुरुस्तीबद्दल जाणून घ्यावे लागेल की, पुढे चार दिवसात तो बरा होऊ शकेल की नाही. फिजिओने स्कॅन केल्यानंतर पुढील स्थिती स्पष्ट होईल.’
याबरोबरच द्रविडने सिराजच्या गोलंदाजीबद्दल बोलताना म्हटले, ‘सिराज पहिल्या डावात पूर्णपणे तंदुरूस्त नव्हता. आमच्याकडे पाचवा गोलंदाज होता, पण आम्ही त्याचा हवा तसा उपयोग करू शकलो नाही. यामुळे आमच्या रणनीतीवर प्रभाव पडला.’
अधिक वाचा – राडाच ना! भर मैदानात एल्गर-सिराज भिडले, वाद थांबवण्यासाठी कर्णधार केएल राहुलचा हस्तक्षेप
सध्या तरी सिराज तंदुरुस्त होण्याच्या प्रयत्नात असेल. पण, जर तो तिसऱ्या कसोटपूर्वी पूर्ण तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्याऐवजी उमेश यादव किंवा इशांत शर्मा यांच्यातील एकाला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली जाऊ शकते.
व्हिडिओ पाहा – टोकियो ऑलिम्पिक… भारतीय क्रीडाक्षेत्रात इतिहास घडवणारी स्पर्धा
तिसरा कसोटी सामना ११ ते १५ जानेवारी दरम्यान न्यूलँड्स, केपटाऊन येथे होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो संघ मालिकाही जिंकणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी भारतीय संघाने कधीही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकलेली नाही, त्यामुळे यंदा भारतीय संघाकडे कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची चांगली संधी असणार आहे. पण, याबरोबरच यजमान दक्षिण आफ्रिकाही भारतासमोर तगडे आव्हान ठेवण्याचा प्रयत्न करतील.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटचे केपटाऊन कसोटीत खेळणे जवळपास पक्केच, पण मग संघाबाहेर होणार कोण? ‘हे’ आहेत ४ पर्याय
‘क्रमांक ७ अजूनही मन जिंकतोय’, धोनीकडून ‘हे’ गिफ्ट मिळताच पाकिस्तानी गोलंदाजाचे इमोशनल ट्वीट
क्रिकेटच्या मैदानात पुन्हा दिसणार कैफची चित्त्यासारखी चपळाई! ‘या’ स्पर्धेतील सहभाग झाला निश्चित