अहमदाबाद येथे भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील अखेरचा निर्णायक सामना गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर २२४ धावा फलकावर लावल्या. यासोबतच भारतीय संघाच्या नावे एका विक्रमाची नोंद झाली.
भारतीय संघाचा धावांचा डोंगर
इंग्लंडने या अखेरच्या सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघासाठी कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांनी सलामी दिली. रोहितने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये ६४ धावांची तुफानी खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या सूर्यकुमार यादवने देखील ३२ धावा जोडल्या. त्यानंतर, विराट कोहलीने भारतीय संघाच्या डावाची जबाबदारी घेऊन अखेरपर्यंत नाबाद राहत ८० धावा फटकावल्या. त्याला, हार्दिक पंड्याने ३९ धावा काढून साथ दिली. अशाप्रकारे, भारतीय संघाने २ बाद २२४ धावांचा डोंगर उभा केला.
भारतीय संघाचा विक्रम
या सामन्यातील २०० धावांसह भारतीय संघाने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १८ व्या वेळी २०० धावांचा पल्ला गाठला. २००६ सालापासून आजतागायत भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे. भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाने १४ वेळेस अशी कामगिरी नोंदवली. तिसर्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडने अनुक्रमे १३ आणि ११ वेळेस अशी कामगिरी केली आहे. यापाठोपाठ इंग्लंड १० तर, वेस्ट इंडीजने ८ वेळा २०० धावा फटकावल्या आहेत.
इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव
मालिकेचा निकाल ठरवणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या २२५ धावांच्या आव्हानासमोर इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जेसन रॉय खाते ही न खोलता बाद झाल्यानंतर जोस बटलर व डेव्हिड मलान यांनी १३० धावांची भागीदारी केली. दोघांनी अनुक्रमे ५२ व ६८ धावांच्या खेळ्या केल्या. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला खास काहीही करता आले नाही. त्यामुळे त्यांना २० षटकात ८ बाद १८८ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटने सर केले विक्रमाचे आणखी एक शिखर, ‘या’ यादीत पोहोचला अव्वलस्थानी
मलानचा विश्वविक्रम! ६५ वी धाव घेताच कोहली, बाबर आझमला टाकले मागे
आशिया खंडात डंका वाजवलेल्या दिग्गज फलंदाजांच्या ‘या’ खास यादीत आता विराटचाही समावेश