---Advertisement---

विसाव्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ २५००० डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरीत मोयुका उचिजिमा, डायना मार्सिंकेविकाचा अंतिम फेरीत प्रवेश

---Advertisement---

पुणे| डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 20व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत जपानच्या मोयुका उचिजिमा, लात्वियाच्या डायना मार्सिंकेविका या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत जपानच्या बिगरमानांकीत मोयुका उचिजिमा हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत पाचव्या मानांकित उझबेकिस्तानच्या नायजीना अब्दुरैमोव्हाचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1 तास 28 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीला सावध खेळ केला व आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यानंतर मोयुकाने बॅकहँड व फोरहँडकचा सुरेख वापर करत पाचव्या गेममध्ये नायजीनाचा सर्व्हिस भेदली व सामन्यात आघाडी घेतली.

पिछाडीवर असलेल्या नायजीनाला कमबॅक करण्यास मोयुकाने फारशी संधी दिली नाही व सातव्या गेममध्येमोयुकाने नायजीनाची पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-2 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये नायजीनाने आपल्या खेळात नवीन रणनीती आखत दुसऱ्याच गेममध्ये मोयुकाची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत 3-0अशी आघाडी मिळवली. पण ही आघाडी तिला फार काळ टिकवता आली नाही. मोयुकाने उत्कृष्ट खेळ करत नायजीनाची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतरही मोयुकाने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवत सातव्या, नवव्या गेममध्ये नायजीनाची सर्व्हिस ब्रेक केली व हा 6-3 असा जिंकून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. मोयुका हिने आतापर्यंत स्पर्धेत तीन मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवला आहे.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लात्वियाच्या चौथ्या मानांकित डायना मार्सिंकेविका हिने काल अव्वल मानांकित खेळाडूवर विजय मिळवणाऱ्या रशियाच्या एकतेरिना रेनगोल्डचा टायब्रेकमध्ये 6-3, 4-6, 7-6(2) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 2तास 38मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये डायनाने वर्चस्व राखत चौथ्या गेममध्ये एकतेरीनाची सर्व्हिस भेदली व हा सेट 6-3 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये एकतेरीना जोरदार पुनरामन करत दुसऱ्या, सहाव्या गेममध्ये डायनाची सर्व्हिस रोखली व हा सेट 6-4 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये एकतेरीनाने चौथ्या गेममध्ये डायनाची सर्व्हिस रोखली व अशी 3-1आघाडी मिळवली. पण डायनाने पुढच्याच गेममध्ये एकतेरीनाची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखल्या व हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये डायनाने आक्रमक खेळ करत हा सेट 7-6(2) असा जिंकून विजय मिळवला.

दुहेरीत उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या ऍना डॅनिलिना व युक्रेनच्या व्हॅलेरिया स्त्राकोव्हा या अव्वल मानांकित जोडीने भारताच्या ऋतुजा भोसले व जपानच्या हिरोको कुवाटा या जोडीवर सुपरटायब्रेकमध्ये 3-6, 6-2, [11-9] असा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात जपानच्या फुना कोजाकी व मिसाकी मत्सुदा यांनी कझाकस्तानच्या झिबेक कुलंबायेवा व रशियाच्या एकतेरिना याशिना यांचा 6-4, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: महिला एकेरी:
डायना मार्सिंकेविका (लात्विया) [4] वि.वि.एकतेरिना रेनगोल्ड (रशिया) 6-3, 4-6, 7-6(2);
मोयुका उचिजिमा (जपान) वि.वि. नायजीना अब्दुरैमोव्हा (उझबेकीस्तान) [5] 6-2, 6-3;

दुहेरी गट: उपांत्य फेरी:
ऍना डॅनिलिना (कझाकस्तान) /व्हॅलेरिया स्त्राकोव्हा(युक्रेन) [1]वि.वि.ऋतुजा भोसले (भारत) / हिरोको कुवाटा (जपान) [4] 3-6, 6-2, [11-9];
फुना कोजाकी (जपान) /मिसाकी मत्सुदा (जपान) वि.वि.झिबेक कुलंबायेवा (कझाकस्तान) [2] /एकतेरिना याशिना (रशिया)6-4, 6-4.

महत्त्वाच्या बातम्या-

हरभजनच्या निवृत्तीनंतर पत्नीची भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘त्याला अशी निवृत्ती नको होती, पण..’

जगातील कोणत्याही संघाला पुरून उरेल भारताचा हा संघ, १९८३ आणि २०११च्या विश्वविजेत्या खेळाडूंचा आहे समावेश

‘मास्टर ब्लास्टर’ सचिनलाही पडली रोहितच्या कसोटीतील फलंदाजीची भुरळ, कौतुकाने म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---