इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अंतिम फेरीत शुक्रवारी संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्स संघ कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळेल. चौथ्यांदा या स्पर्धेची ट्रॉफी उंचावण्याचा संघाचा हेतू असेल. कर्णधार एमएस धोनीचा खेळाडू म्हणून हा शेवटचा आयपीएल सामना असू शकतो, असा अनेक चा अंदाज वर्तवत आहेत. त्याच वेळी माजी भारतीय सलामीवीर आकाश चोप्राने याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
धोनीच्या भविष्याबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा म्हणाला,
“सीएसके धोनीला कायम ठेवेल यात काही शंका नाही. मग त्याला कोणत्या हेतूने कायम ठेवले जाईल हे त्याच्यावर अवलंबून आहे. चेन्नई संघ आणि धोनी यांच्यात कधीही न संपणारे संबंध आहेत. धोनी आणि सीएसके एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर त्याला आणखी एक हंगाम खेळायचा असेल तर तो पुढील सहा महिन्यांत होणार आहे. हा निर्णय सर्वस्वी त्याचा असेल. या हंगामाच्या समाप्तीनंतर, आयपीएलचा मेगा लिलाव होईल ज्यामध्ये एका संघाला जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवण्याची संधी असेल. याव्यतिरिक्त, उरलेल्या सर्व खेळाडूंचा लिलावात समावेश असेल. जर धोनीला पुढचा हंगाम खेळायचा असेल, तर सीएसके त्याला कायम ठेवेल. परंतु, जर त्याने संघासोबत मार्गदर्शक म्हणून काम करताना त्याच्या जागी दुसरा खेळाडू कायम ठेवण्याचा पर्याय दिला, तर ते संघाच्या भविष्यासाठी चांगले होईल.”
चोप्रा पुढे बोलताना म्हणाला,
“धोनीला हे देखील माहित आहे की पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे आणि पुढील तीन हंगामांसाठी एका खेळाडूवर भरपूर पैसे खर्च केले जातील. जर असेच होणार असेल तर तुम्ही एक चांगला संघ बनवू शकता. ही गोष्ट देखील धोनीचा कुठेतरी मनात असेल. तर मला वाटते की एमएस आता चेन्नई संघासोबत खेळाडू म्हणून नव्हे तर एक मार्गदर्शक म्हणून दिसेल.”
चेन्नईने आत्तापर्यंत धोनीच्या नेतृत्वात तीन आयपीएल विजेतेपदे आपल्या नावे केली आहेत. शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात कोलकात्याला हरवून ते आपले चौथे विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नई वि. कोलकाता अंतिम सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
सीएसके आणि आयपीएल जेतेपदाच्या आड येऊ शकतात केकेआरचे फॉर्मात असलेले ‘हे’ ४ शिलेदार