सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ बांगलादेश दौऱ्यावर असून, उभय संघांमध्ये प्रथमच द्विपक्षीय टी२० मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघांमध्ये शुक्रवारी (६ ऑगस्ट) मालिकेतील तिसरा टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस या वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने पदार्पणातच हॅट्रिक नोंदवत ऐतिहासिक कामगिरी केली.
एलिसची शानदार गोलंदाजी
तिसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी २६ वर्षीय वेगवान गोलंदाज नॅथन एलिसने पदार्पण केले. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने बांगलादेशच्या डावातील अखेरचे षटक टाकताना ऐतिहासिक कामगिरी केली. षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने बांगलादेशचा कर्णधार महमद्दुलाह याला त्रिफळाचीत केले. पुढील चेंडूवर त्याने मुस्तफिझुर रहमान याला मिचेल मार्शच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. डावातील अखेरच्या चेंडूवर मेहदी हसनला बाद करत त्याने आपली हॅट्रिक पूर्ण केली. एलिसने आपल्या चार षटकात ३४ धावा देऊन तीन गडी बाद केले. आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात हॅट्रिक करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे.
अशी राहिली आहे कारकीर्द
एलिस हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीजचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आत्तापर्यंत खेळलेल्या ७ प्रथमश्रेणी सामन्यात ३५, ११ लिस्ट ए सामन्यात १६ व ३२ टी२० सामन्यात ३६ बळी घेण्यात यशस्वी ठरला आहे. एलिस बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन संघासाठी खेळतो.
सलग तिसऱ्या सामन्यात झाला ऑस्ट्रेलियाचा पराभव
पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत यजमान बांगलादेशने पहिले तीन सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने दिलेल्या १२८ धावांच्या आव्हानासमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अत्यंत संथपणे फलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलिया विजय लक्ष गाठण्यापासून १० धावा दूर राहिला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिज विरुद्धची टी२० मालिका देखील ४-१ अशा फरकाने गमावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
अर्धशतक पूर्ण करताच मोठा फटका मारण्याच्या नादात ‘असा’ बाद झाला रविंद्र जडेजा, पाहा व्हिडिओ
Video: पंतने सलग २ चेंडूत मारले चौकार-षटकार, पण त्यापुढच्याच चेंडूवर झाला ‘असा’ बाद