भारताचा अनुभवी यष्टीरक्षक कर्णधार एमएस धोनीने आत्तापर्यंत अनेक मोठे विक्रम केले आहेत. रांची सारख्या छोट्या शहरातून आलेल्या धोनीचा डिसेंबर २००४ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरु झालेला प्रवास भारताचा यशस्वी कर्णधारापर्यंत झाला. या प्रवासात त्याने अनेक मोठ्या खेळी केल्या.
या दरम्यान त्याच्या आंतराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणानंतर पहिल्या १-२ वर्षांतच त्याच्या नावावर एक विश्वविक्रम नोंदवला गेला. तो विश्वविक्रम म्हणजे कमी डावात आयसीसी वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवणारा खेळाडू. Number of matches to reach No. 1 ranking in ODIs
धोनीने २३ डिसेंबर २००४ ला बांगलादेश विरुद्धच्या वनडे सामन्यातून पदार्पण केले. त्यानंतर त्याने त्याच्या ५ व्या वनडे सामन्यात पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांची खेळी केली. त्यानंतर काही दिवसांनी त्याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ धावांची खेळी केली.
त्यामुळे तो केवळ ४२ डाव खेळल्यानंतर १९ एप्रिल २००६ ला म्हणजे १४ वर्षांपूर्वी वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर विराजमान झाला होता. त्यावेळी वनडेच्या फलंदाजी क्रमवारीत सर्वात जलद अव्वल क्रमांक मिळवण्याचा विक्रम धोनीच्या नावावर झाला होता.
धोनीचा हा विक्रम आजही कोणाला मोडता आलेला नाही. अगदी भारताच्या वनडेमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहलीलाही आयसीसीच्या वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी १०० पेक्षा अधिक सामने खेळावे लागले होते.
सचिनने १०५ वनडे सामने खेळल्यानंंतर २९ फेब्रुवारी १९९६ ला पहिल्यांदा आयसीसीच्या वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला होता. तर विराटला आयसीसीच्या वनडे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी ११८ सामन्यांपर्यंत वाट पहावी लागली होती.
त्याने ११८ वनडे सामने खेळल्यानंतर ३० ऑक्टोबर २०१३ ला पहिल्यांदा वनडे फलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळवला होता. सध्या विराट आयसीसीच्या वनडे क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
धोनीला २०११ विश्वचषकात युवराज किंवा युसुफला बसवुन या खेळाडूला घ्यायचं होतं संघात