भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचा समावेश भारताच्या त्या दिग्गज खेळाडूंमध्ये होतो. ज्यांनी धोनीच्या नेतृत्वात विश्वविजेता होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ मध्ये टी२० विश्वचषक आणि २०११मध्ये वनडे विश्वचषक आपल्या नावावर केला होता.
तसेच या दोन्ही विश्वचषकात युवराजने (Yuvraj Singh) महत्त्वाची भूमिका निभावली होती. विशेष म्हणजे त्याने २०११ विश्वचषकात मालिकावीर पुरस्कार आपल्या नावावर केला होता. नुकत्याच एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये युवराजने आपल्या ६ षटकारांबद्दल खुलासा केला आहे.
युवराजने या मुलाखतीदरम्यान सांगितले की, २००७च्या टी२० विश्वचषकादरम्यान त्याने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) गोलंदाजीवर एका षटकात ६ षटकार ठोकले होते. त्यानंतर लोकांनी त्याच्या बॅटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. इतकेच नव्हे तर विरोधी संघाच्या सांगण्यावरून सामना रेफरीने (Match Referee) त्याच्या बॅटची तपासणी केली होती.
“मला आठवते की, त्या सामन्यादरम्यान एक ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक माझ्या जवळ आले होते. तसेच त्यांनी माझ्या बॅटच्या मागे फायबर लागले आहे का आणि ते कायदेशीर आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर ऍडम गिलख्रिस्ट यांनीही माझ्या बॅटबद्दल मला प्रश्न विचारला होता की, अशाप्रकारच्या बॅट कोण बनवते,” असे युवराज यावेळी म्हणाला होता.
युवराज पुढे म्हणाला की, “त्यामुळेच सामना रेफरीने माझ्या बॅटची तपासणी केली होती. परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो की, ती बॅट माझ्यासाठी खूप विशेष होती. मी यापूर्वी अशाप्रकारे बॅटने कधीच खेळलो नव्हतो. २००७ची बॅट आणि २०११ची बॅट माझ्यासाठी विशेष होती.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-रोहित शर्माला कुणाच्या सर्टिफिकेटची अजिबात गरज नाही
-ब्रायन लारा- सचिन तेंडूलकरमध्ये या खेळाडूला बाद करणे कायमचं कठिण
-एकही मॅन ऑफ मॅच नशिबात नसलेले सर्वाधिक टी२० सामने खेळलेले ५ खेळाडू