वेस्ट इंडीज संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. यावेळी तीन टी२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यात आली आहे. पाकिस्तानने टी२० मालिका ३-० अशी खिशात घातली. तर पहिला वनडे सामनाही ५ विकेट्सने जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. हा सामना जरी हरला असला तरी शाय होपने शतकी खेळी करत अनेक विक्रम नोंदवले आहेत.
मुलतानमध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजचा कर्णधार आणि यष्टीरक्षक निकोलस पुरनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सलामीवीर होपने १३४ चेंडूत १५ चौकार आणि एक षटकाराच्या साहाय्याने १२७ धावा केल्या आहेत. त्याचे हे वनडेमधील १२वे शतक ठरले आहे. यावेळी त्याने वनडेतील ४००० धावांचा टप्पाही पार केला आहे.
वनडेमध्ये सर्वात जलद ४००० धावा करण्याच्या फलंदाजांच्या यादीत होप संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ८८ डावामध्ये ही कामगिरी केली आहे. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज हाशिम आमला अव्वल क्रमांकावर आहे. त्याने २०१३मध्ये ८१ डावांतच ४००० धावा पूर्ण केल्या होत्या.
तसेच या यादीमध्ये पाकिस्तानचा बाबर आजम दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ८२ डावामध्ये ही कामगिरी केली आहे. इंग्लंडचा जो रूट चौथ्या आणि भारताचा विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे.
वनडेमध्ये सर्वात जलद ४००० धावा करणारे फलंदाज:
हाशिम आमला (२०१३) – ८१ डाव
बाबर आजम (२०२२)*- ८२ डाव
विव रिचर्ड्स (१९८५), शाय होप (२०२२)* – ८८ डाव
जो रूट (२०१७) – ९१ डाव
विराट कोहली (२०१३) – ९३ डाव
डेविड वॉर्नर (२०१७) – ९३ डाव
वेस्ट इंडीजकडून वनडेमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्या यादीत होप चौथ्या क्रमांकावर आहे. यावेेळी त्याने विव रिचर्ड्स, शिवनारायण चंद्रपॉल यांना मागे टाकले आहे. ख्रिस गेल २५ शतके करत अव्वल क्रमांकावर आहे. ब्रायन लाराच्या नावावर १९, तर डेसमन्ड हेन्सने १७ शतके केली आहेत.
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात होप बरोबर शमराह ब्रुक्सने ७० धावा केल्या. वेस्ट इंडीजने ५० षटकात ८ विकेट्स गमावत ३०५ धावासंख्या उभारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने ५ विकेट्स गमावत हा सामना जिंकला. यावेळी पुन्हा एकदा बाबरने उत्तम खेळी केली आहे. त्याने १०७ चेंडूत १०३ धावा केल्या. त्याला सलामीवीर इमाम-उल-हक आणि मोहम्मद रिजवान यांनी योग्य साथ दिली. या दोघांनीही अर्धशतकी खेळी करत संघाला विजयापर्यंत पोहोचवले.
या मालिकेतील दोन उर्वरित वनडे सामने १० आणि १२ जूनला मुलतानच्या क्रिकेट स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडने ३ रनांनी मॅच मारली, आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक पराभवामुळे हसी क्रिकेटर झाला
रिषभ पंत असेल भारताचा टी२०तील आठवा कर्णधार, पाहा याआधीच्या कॅप्टन्सची लिस्ट आणि त्यांची कामगिरी