क्रिकेटमध्ये बरेच विक्रम होत असतात. काही विक्रम खास असतात जे कायम लक्षात राहतात. असाच एक विक्रम पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जलालुद्दीनच्या नावावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज आहे. त्याने हा विक्रम आजच्या दिवशी म्हणजेच २० सप्टेंबर १९८२ रोजी केला होता. त्याने हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता. मात्र, त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द फार काळ टिकली नाही. तो फक्त ८ एकदिवसीय सामने खेळू शकला. एवढेच नाही तर त्याला फक्त ६ कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार किम ह्युजेसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ४० षटकांत ६ बाद २२९ धावा केल्या होत्या. सलामीवीर मोहसिन खानने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले होते. त्याने १०१ चेंडूत १०४ धावा केल्या. या खेळीत त्याने १५ चौकार ठोकले होते. जावेद मियांदाद ३१ धावांवर नाबाद राहिला. कर्णधार झहीर अब्बासने २६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून टेरी एल्डरमनने ६३ धावा देत २ बळी घेतले होते.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने संथ सुरुवात केली. एकावेळी त्यांची धावसंख्या ४ गडी बाद १५७ धावा अशी होती. यानंतर, जलालुद्दीनने आपल्या ७ व्या षटकाच्या शेवटच्या ३ चेंडूंमध्ये ३ गडी बाद करत पाकिस्तानच्या विजयाची पुष्टी केली आणि हॅट्रिक नोंदवली.
प्रथम त्याने रॉड मार्श (१) ला बाद केले. त्यानंतर ब्रूस यार्डलीला (०) यष्टीमागे झेलबाद केले आणि शतकाच्या शेवटच्या चेंडूवर ज्योफ लॉसनने (०) बाद करत त्याने आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. या पराक्रमामुळे तो एकाच दिवसात पाकिस्तानचा नायक बनला.
एकदिवसीय क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर आतापर्यंत गोलंदाजांनी ४९ वेळा हॅट्रिक घेतली आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू लसिथ मलिंगाने सर्वाधिक ३ वेळा हा पराक्रम केला आहे. याशिवाय भारताचा कुलदीप यादव, श्रीलंकेचा चामिंडा वास, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, पाकिस्तानचा वसीम अक्रम आणि सकलेन मुश्ताक यांनी हा पराक्रम २-२ वेळा केला आहे.
आकिब जावेद, वकार युनूस आणि मोहम्मद शमी यांनीही प्रत्येकी एकदा हॅट्रिक घेतली आहे. सर्वाधिक ९ वेळा हॅट्रिक करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या गोलंदाजांच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंडचा पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका; जळफळाट झालेल्या अध्यक्षांचं खेळाडूंना भावनिक आवाहन
धोनीने डीआरएसची मागणी करताच फलंदाजाने धरली पॅव्हेलियनची वाट, पाहा व्हिडिओ
‘मिस्टर ३६०’ च्या नावे नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ गोलंदाजांनी डिविलियर्सला केलंय ‘गोल्डन डक’वर बाद