महिला बिग बॅश लीग २०२१ च्या साखळी फेरीपासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या पर्थ स्कॉचर्स संघाने प्रथमच चषक जिंकला आहे. पर्थ स्कॉचर्सने शनिवारी (२७ नोव्हेंबर) झालेल्या अंतिम सामन्यात, ऍडलेड स्ट्रायकर्सचा १२ धावांनी पराभव करत चषकावर आपले नाव कोरले. यासह महिला बिग बॅश लीगने आपला नवीन विजेता संघ देखील मिळवला. यापूर्वी ब्रिस्बेन हीट, सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर्स यांनी प्रत्येकी दोनदा ही लीग जिंकली होती.
प्रथम फलंदाजी करताना पर्थने २० षटकांत ५ गडी गमावून १४६ धावा केल्या. संघाकडून कर्णधार मारिजने कापने ३३ चेंडूत सर्वाधिक ३५ धावा केल्या. ऍडलेडसाठी वेगवान गोलंदाज मेगन शुट सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने ४ षटकांत केवळ १९ धावा देत १ बळी घेतला.
प्रत्युत्तरात, ऍडलेडच्या संघाला २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १३४ धावा करता आल्या. त्यांनी हा अंतिम सामना १२ धावांनी गमावला. संघाकडून कर्णधार ताहलिया मॅकग्राने २९ चेंडूत सर्वाधिक ३६ धावा केल्या. पर्थकडून तेनिल पेशलने ४ षटकात केवळ २३ धावा देत २ बळी घेतले.
स्पर्धेच्या इतिहासात मागील दोन वेळा अंतिम फेरीत अपयशी ठरल्यानंतर, पर्थ संघाने अखेर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचे टी२० विजेता बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेची सर्वोत्कृष्ट अष्टपैलू मरिजाने कापच्या अष्टपैलू कामगिरीने पर्थच्या विजयाचा पाया रचला. तिने केवळ २३ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या आणि १ बळी घेतला. या कामगिरीसाठी तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
या लीगमध्ये अनेक भारतीय महिला खेळाडूंनी भाग घेतला. ज्यामध्ये भारतीय टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, सलामीवीर स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पूनम यादव, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचाही समावेश होता. महिला बिग बॅश लीगच्या या हंगामात भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी पाहायला मिळाली.
हरमनप्रीत कौरला तिच्या उत्कृष्ट अष्टपैलू खेळासाठी या हंगामातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताबही मिळाला. हरमनप्रीतने लीगमधील १३ सामन्यात ४०६ धावा आणि १५ विकेट घेतल्या. याशिवाय सलामीवीर स्मृती मानधनाने १३ सामन्यात एका शतकासह ३७७ धावा केल्या आहेत. दीप्ती शर्मानेही चमकदार कामगिरी केली. दीप्तीने १३ सामन्यांत २११ धावा आणि १३ विकेट घेतल्या.