पुणे। वॉरियर्स आणि जेट्स यांच्यात पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अंतिम लढत रंगणार आहे. पूना क्लबच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य लढतीत जेट्स संघाने ऑल स्टार्स संघावर चार ग़डी राखून मात केली. यात जेट्स संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून ऑल स्टार्सला निर्धारित सहा षटकांत ४ बाद ४३ धावांत रोखले. ऑल स्टार्सच्या एकाही फलंदाजाला फटकेबाजी करता आली नाही. यानंतर जेट्स संघाने विजयी लक्ष्य ५.१ षटकांत चार गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. जेट्स संघाकडून कर्णधार चिराग लुल्लाने १९ चेंडूंत चार चौकारांसह २६ धावा केल्या.
यानंतर झालेल्या दुस-या उपांत्य लढतीत वॉरियर्स संघाने टायगर्स संघावर २८ धावांनी मात केली. वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित सहा षटकांत बिनबाद ८६ धावा केल्या. यात आरव वीजने २३ चेंडूत सात षटकार व तीन चौकारांसह नाबाद ६७ धावा केल्या, तर आर्यन गाडगीळने १३ चेंडूत १९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टायगर्स संघाला ६ बाद ५८ धावाच करता आल्या. यात सलामीवीर अर्जुन मोटाडूने सात चेंडूंत सर्वाधिक १६ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक –
ऑल स्टार्स – ६ षटकांत ४ बाद ४३ (मेहुल १०, अनुज मुथा १-५, चिराग लुल्ला १-९, शरण सिंग १-६, ऋषभ बजाज १-६) पराभूत वि. जेट्स – ५.१ षटकांत ४ बाद ४४ (चिराग लुल्ला २६, मेहुल २-७, प्रोमीत सूद १-३). सामनावीर – चिराग लुल्ला
वॉरियर्स – ६ षटकांत बिनबाद ८६ (आरव वीज नाबाद ६७, आर्यन गाडगीळ १९) वि. वि. टायगर्स – ६ षटकांत ६ बाद ५८ (अर्जुन मोटाडू १६, आदिश शहा १०, रजत श्रॉफ २-१०, झियान तलब १-६, आर्यन गाडगीळ १-७). सामनावीर – आरव वीज