भारताचा दिग्गज फलंदाज आणि संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. गेल्या काही काळात विराटने खेळलेल्या बहुतांश सामन्यात त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अनेक क्रिकेट चाहते आणि दिग्गजांकडून विराटला ट्रोल करण्यात येत आहे. मात्र, अशातच ऑस्ट्रेलिया संघाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने विराटची पाठराखण करत विराटला विशेष सल्ला दिला आहे.
आयसीसीच्या (ICC) एका कार्यक्रमात रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला की, “खराब फॉर्म प्रत्येकाला कधी ना कधी येतो. विराटने (Virat Kohli) १० किंवा १२ वर्षांच्या कारकिर्दीत फार कमी खराब फॉर्म पाहिला असेल. आयपीएल दरम्यान तो थकलेला असू शकतो याबद्दल बरीच चर्चा आणि उदाहरणे दिली जात होती. स्वतःला सुधारण्याचे मार्ग शोधून काढणे हे त्याचे काम आहे. मला खात्री आहे की तो यावर उपाय शोधून लवकरच त्यावर काम करेल.”
स्वतःचे उदाहरण देताना पाँटिंग म्हणाला की, “मला अनुभवातून एक गोष्ट कळते की, कधी कधी एक खेळाडू म्हणून तुम्ही स्वतःला फसवता की तुम्ही खरोखर थकलेले नाही, तुम्ही मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या थकलेले नाही. तुम्ही सामने खेळण्यासाठी स्वत:ची तयारी करत रहा. पण जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा एक-दोन दिवसांनी तुम्हाला कळते की तुम्ही किती थकले आहात. त्यामुळे कदाचित विराट कोहलीही सध्या त्याच स्थितीत असेल, पण मला खात्री आहे की कोहलीचा हा वाईट टप्पा फार काळ टिकणार नाही.”
दरम्यान, भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ टी२० सामन्यांची मालिका खेळत आहे. मायदेशातील या मालिकेसाठी संघाचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) विराटला देखील विश्रांती देण्यात आली आहे. त्यानंतर सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी विराटला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे आयपीएलनंतर विराट कोहली थोडी विश्रांती घेऊन इंग्लंडविरुद्धच्य मालिकेत आपल्या पूर्वीच्या रुपात दिसू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
क्रिकेटविश्वात कोणालाच न जमलेला विक्रम बाबर आजमने केलायं
‘अख्तरसोबत उमरानची तुलना अयोग्य’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या कर्णधाराचा सल्ला
गडी काय थांबना!, आयपीएल संपल्यानंतर अश्विन करतोय इंग्लंडविरुद्धच्या कसोटीची विशेष तयारी