Virat Kohli Will Break Records: भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि विक्रम यांचं जवळचं नातं आहे. विराट जेव्हाही मैदानावर उतरतो, तेव्हा विक्रमांची यादी भलीमोठी दिसते. नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान विराटने विक्रमांचा पाऊस पाडला होता. तसेच, तो वनडे क्रिकेटमधील किंग बनला होता. सध्या विराट भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात अखेरची 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका जिंकून भारतीय संघ इतिहास घडवण्याची योजना आखत आहे. तसेच, विराट कोहली याच्या विक्रमावरही सर्वांच्या नजरा आहेत. विराटकडे फक्त 4 दिवस आहेत, ज्यामध्ये त्याला विश्वविक्रम नावावर करण्याची संधी आहे.
विराट कोहली (Virat Kohli) कसोटी मालिकेपूर्वी लंडन ट्रिपवर होता. असे म्हटले जात होते की, विराट कौटुंबिक इमर्जन्सीमुळे दक्षिण आफ्रिकेहून लंडनला गेला आहे. मात्र, ही फक्त अफवा ठरली. कारण, ही त्याची पूर्वनियोजित ट्रिप होती. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघात 26 डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याच्या 3 दिवसांपूर्वीच विराट संघाशी जोडला गेला आहे. विराटने जर पहिल्या कसोटीत शतक ठोकले, तर तो 2 विक्रम आपल्या नावावर करू शकतो. यातील एक विक्रम कसोटी क्रिकेटमध्ये परदेशात सर्वाधिक शतकांचा आहे. तसेच, दुसरा विक्रम विराट सर्वाधिक वेळा एका कॅलेंडर वर्षात 2000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज बनू शकतो.
स्टीव्ह स्मिथच्या नावे सर्वाधिक शतके
फॅब फोरचा विचार केला, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) अव्वलस्थानी आहे. एवढंच नाही, तर स्मिथने परदेशात सर्वाधिक 16 शतके ठोकली आहेत. या बाबतीत विराट दुसऱ्या स्थानी आहे. त्याने परदेशात 15 शतके झळकावली आहेत. जर त्याने एक शतक केले, तर तो स्मिथची बरोबरी करत संयुक्तरीत्या अव्वलस्थानी येऊ शकतो.
कुमार संगकारा पडेल मागे
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा एका कॅलेंडर वर्षात 2000 हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये कुमार संगकारा (Kumar Sangakkara) आणि विराट कोहली संयुक्तरीत्या अव्वलस्थानी आहेत. संगकाराने आणि विराटने 6 वेळा एका कॅलेंडर वर्षात 2000 हून अधिक धावा केल्या आहेत. विराटच्या सध्या 1934 धावा आहेत. तो यावर्षी 2000 धावा करण्यापासून फक्त 66 धावा दूर आहे. पहिल्या कसोटीत जर विराटने 66 धावा केल्या, किंवा शतक ठोकले, तर तो सर्वाधिक वेळा एका कॅलेंडर वर्षात 2000 हून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनेल. आता विराट हा विक्रम करतो की नाही, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. (Run Machine virat kohli century will break 2 big records and he can become number 1 before new year in INDvsSA 1st test)
हेही वाचा-
‘DRSचा वापर करण्यात राहुलपेक्षा भारी कुणीच नाही’, पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा
IND vs SA । अर्शदीपच्या कामगिरीचा आई-वडिलांनाही अभिमान! वेगवान गोलंदाजाची पोस्ट चर्चेत