मुंबई । क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडेल असा सचिन तेंडुलकरच्या इंडिया लिजंड्स आणि ब्रायन लाराच्या वेस्ट इंडिज लिजंड्स यांच्या दरम्यानचा अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा पहिला सामना क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर ७ मार्च २०२० रोजी होणार आहे. या सीरिजचा. अंतिम सामना ब्रेबन स्टेडियमवर (सीसीआय) २२ मार्च २०२० रोजी खेळला जाईल. सर्व सामने सायंकाळी ७ वाजता सुरु होतील आणि कलर्स सिनेप्लेक्स, कलर्स कन्नड सिनेमा आणि दूरदर्शन या वाहिन्यांवर सामान्यांचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. वूट, जिओ हे या सीरिजचे डिजिटल पार्टनर्स आहेत.
सीरिजमधील एकूण ११ सामन्यांपैकी दोन सामने वानखेडे स्टेडियमवर, चार सामने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर, चार सामने नेरुळ (नवी मुंबई) येथील डी वाय पाटील स्टेडियमवर आणि सीरिजचा शिरोमणी ठरेल असा अंतिम सामना ब्रेबोन स्टेडियमवर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) येथे होईल. पुणे स्टेडियमवर भारतीय संघाच्या दोन मॅचेस (१४ मार्च रोजी साऊथ आफ्रिका लिजंड्ससोबत आणि २० मार्च रोजी ऑस्ट्रेलिया लिजंड्ससोबत) होतील, वानखेडे आणि डी वाय पाटील या स्टेडियम्सवर भारतीय संघाचा प्रत्येकी एक-एक सामना होणार आहे.
या सामान्यांची तिकिटे फक्त बुकमायशोवर १३ फेब्रुवारी २०२० रोजी (गुरुवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून ऑनलाईन विकत घेता येतील. तिकिटांच्या किमती ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहेत ज्यामुळे क्रिकेटप्रेमींना आपल्या आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचा आनंद लुटता येईल. तिकीटविक्रीतून मिळणाऱ्या रकमेपैकी काही भाग देशात रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी वापरला जाईल.
अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज ही टी-२० टूर्नामेंट पाच देशांदरम्यान खेळली जाणार असून भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका या देशांमधील दिग्गज खेळाडू यामध्ये सहभागी होत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर, वीरेंदर सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, ब्रायन लारा, शिवनारायण चंदरपॉल, ब्रेट ली, ब्रॅड हॉज, जॉन्टी ऱ्होड्स, हाशिम आमला, मुथैय्या मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, अजंता मेंडिस आणि इतर अनेक खेळाडूंना यामध्ये खेळताना पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार, पद्म भूषण आणि लिविंग लिजंड म्हणून नावाजले जाणारे श्री. सुनील गावस्कर हे या सीरिजचे कमिशनर आहेत.
स्पर्धेचे वेळापत्रक (सर्व सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता सुरु होतील)
७ मार्च २०२०: इंडिया लिजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लिजंड्स @ वानखेडे (मुंबई)
८ मार्च २०२०: ऑस्ट्रेलिया लिजंड्स विरुद्ध श्रीलंका लिजंड्स @ वानखेडे (मुंबई)
१० मार्च २०२०: इंडिया लिजंड्स विरुद्ध श्रीलंका लिजंड्स @ डीवाय पाटील (नवी मुंबई)
११ मार्च २०२०: वेस्ट इंडिज लिजंड्स विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजंड्स @ डीवाय पाटील (नवी मुंबई)
१३ मार्च २०२०: साऊथ आफ्रिका लिजंड्स विरुद्ध श्रीलंका लिजंड्स @ डीवाय पाटील (नवी मुंबई)
१४ मार्च २०२०: इंडिया लिजंड्स विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजंड्स @ एमसीए स्टेडियम (पुणे)
१६ मार्च २०२०: ऑस्ट्रेलिया लिजंड्स विरुद्ध वेस्ट इंडिज लिजंड्स @ एमसीए स्टेडियम (पुणे)
१७ मार्च २०२०: वेस्ट इंडिज लिजंड्स विरुद्ध श्रीलंका लिजंड्स @ एमसीए स्टेडियम (पुणे)
१९ मार्च २०२०: ऑस्ट्रेलिया लिजंड्स विरुद्ध साऊथ आफ्रिका लिजंड्स @ डीवाय पाटील (नवी मुंबई)
२० मार्च २०२०: इंडिया लिजंड्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया लिजंड्स @ एमसीए स्टेडियम (पुणे)
२२ मार्च २०२०: अंतिम सामना @ ब्रेबोन स्टेडियम (सीसीआय, मुंबई)