बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन व बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. या वादामुळे शाकिबच्या आगामी आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आयपीएलमध्ये आपल्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्यात यावी की नाही, याबाबत क्रिकेट बोर्ड पुनर्विचार करणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी संचालक अक्रम खान यांनी याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल खेळण्याविषयी दोन दिवसात होईल निर्णय
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी संचालक अक्रम खान यांनी क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमूल हसन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आयपीएल मुद्द्यावरील प्रश्नांची उत्तरे दिली. खान म्हणाले, “शाकिबच्या आगामी आयपीएलमध्ये खेळण्याविषयी दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचे ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे की नाही, याबाबत लवकरच कळविण्यात येईल. त्याच्यामते मी त्याचे पत्र नीट वाचले नाही. त्याच्या म्हणण्यानुसार तो देशासाठी कसोटी खेळण्यास उत्सुक आहे. मात्र, तो कसोटीऐवजी आयपीएल खेळण्यास प्राधान्य देत असल्याचे त्याच्या पत्रामध्ये स्पष्टपणे दिसत आहे.”
दुसरीकडे शाकिबने या आरोपाचे खंडन करताना, आपल्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला असे सांगितले होते. बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका २१ एप्रिलपासून खेळवली जाईल. मालिकेतील दुसरा सामना ३ मे रोजी संपन्न होईल. ज्यामुळे, शाकिब निम्म्या स्पर्धेला मुकू शकतो.
आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक आहे शाकिब
काही दिवसांपूर्वी शाकिबने म्हटले होते, “देशासाठी कसोटी खेळण्यापेक्षा आगामी टी२० विश्वचषकाच्या अनुषंगाने आयपीएलमध्ये खेळणे फायदेशीर ठरेल.” यानंतर हे सर्व प्रकरण तापले होते. शाकिबला आयपीएल लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ३.४० कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
राजस्थान रॉयल्सचा होईल तोटा
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयपीएलमध्ये आपल्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी न दिल्यास कोलकातासोबत राजस्थान रॉयल्सलादेखील या निर्णयाचा फटका बसेल. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान राजस्थान संघाचा भाग आहे. आयपीएलची सुरुवात ९ एप्रिलपासून होईल.
महत्वाच्या बातम्या:
अद्वितीय! युवराजच्या कारकिर्दीला लाभली सोनेरी किनार, उंचावली आणखी एक ट्रॉफी
अन् दस्तरखुद्द आनंद महिंद्रा यांनी शब्द पाळला; सोशल मीडियावर होतंय कौतुक
विजेत्या इंडिया लीजेंड्सचे हॉटेल स्टाफतर्फे जंगी स्वागत, युवीचा झक्कास डान्स लावेल वेड; पाहा व्हिडिओ