दक्षिण आफ्रिका संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात टी२० मालिकेचा थरार चालू आहे. मंगळवार रोजी (२९ जून) ग्रेनाडा येथे टी२० मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात अंतिम क्षणी १ धावेने विजय मिळवत दक्षिण आफ्रिकाने मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. तबरेज शम्सी आणि क्विंटन डी कॉक दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे नायक राहिले.
वेस्ट इंडिजने या सामन्यात सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकत पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकाने ८ विकेट्सच्या मोबदल्यात १६७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ७ विकेट्स गमावत १६६ धावाच करू शकला.
फक्त एका धावेने मागे पडला वेस्ट इंडिजचा संघ
दक्षिण आफ्रिकाचा गोलंदाज तबरेज शम्सीने अतिशय कंजूष गोलंदाजी करत संघाचा विजय निश्चित केला. ४ षटके गोलंदाजी करताना अवघ्या १३ धावा देत त्याने २ विकेट्स काढल्या. वेगवान गोलंदाज एन्रिच नॉर्किए यानेही त्याला पुरेपूर साथ दिली. त्याने महत्त्वाच्या क्षणी २ विकेट्स घेत संघाच्या विजयात हातभार लावला.
वेस्ट इंडिजकडून सलामीवीर एविन लेविस आणि याने यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पूरन यांनी सर्वाधिक २७ धावा केल्या. तर आंद्रे रसेल (२५ धावा) आणि लिंडल सिमन्स (२२ धावा) यांना २० धावांचा आकडा पार करता आला. उर्वरित खेळाडू २० पेक्षा कमी धावातच पव्हेलियनला परतले. त्यामुळे केवळ एका धावेने वेस्ट इंडिजला या सामन्यात पराभव पत्कारावा लागला.
क्विंटन डीकॉकच्या तूफानी खेळीचा मोठा वाटा
तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकाकडून यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने सर्वाधिक धावा केल्या. सलामीला फलंदाजीला येत त्याने ५१ चेंडूंमध्ये २ खणखणीत षटकार आणि ५ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. एका बाजूने विकेट्स जात असताना त्याने १८ व्या षटकापर्यंत संघाला डाव पुढे नेला. त्याच्या या तूफानी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकाने २० षटकाखेर ८ बाद १६८ धावा केल्या.
वेस्ट इंडिजकडून डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेद मकॉय याने सर्वाधिक ४ विकेट्स चटकावल्या. तर ड्वेन ब्रावोनेही ३ विकेट्सचे योगदान दिले.
पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पुढील चौथा सामना गुरुवारी (१ जुलै) होणार आहे.