-प्रणाली कोद्रे
साल १९८३ चा विश्वचषक कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्यावेळेच्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला पराभूत करुन जिंकला. आजही त्या विश्वचषकाची ट्रॉफी हातात घेतलेला कपिल देव यांचा फोटो अनेक क्रिकेट प्रेमींकडे असेल. त्या विश्वचषकाने पुढील पिढ्यांना क्रिकेट खेळण्याचे स्वप्न दाखवले. असे असताना एका भारतीय लहान मुलाने तर तो विश्वचषक त्याच्या वडीलांबरोबर प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये जाऊन पाहिला होता. त्यामुळे प्रत्येक लहान मुलाप्रमाणेच त्याच्या मनातही एक दिवस आपणही देशासाठी क्रिकेट खेळाण्याचे स्वप्न पडू लागले. तो मुलगा होता अजय जडेजा.
१ फेब्रुवारी १९७१ ला सौराष्ट्रमधील जमनागरमध्ये राजेशाही घराण्यात अजयचा जन्म झाला. त्यामुळे लहानपणापासून तो राजेशाही थाटातच वाढला. त्यात त्याचे चुलत आजोबा म्हणजे रणजीत सिंग आणि दुलिप सिंग, ज्यांच्या नावावरुन भारतात रणजी ट्रॉफी आणि दुलिप ट्रॉफी या मानाच्या स्पर्धा खेळवल्या जातात. अशा क्रिकेटचा मोठा वारसा लाभलेल्या घरात अजयचा जन्म झाला होता. त्यामुळे क्रिकेट त्याच्या रक्तातच होतचं. Story of Cricketer Ajay Jadeja
राजेशाही घराणे असल्याने पूर्वजांनी जिथे शिक्षण घेतले तिथेच मुलांनीही शिक्षण घ्यावे हे रित त्याच्याही काळात होती. ते कभी खूशी कभी गम मधील अमिताभ बच्चन हृतिक रोशनला सांगतो ना ‘तूम्हारे दादा भी गये थे, मै भी गया था, भैय्या भी गये थे’ अगदी तसेच अजयलाही राजकोटमध्ये वसतीगृहात शिक्षणासाठी जावे लागले होते. पण त्याला काही तिथले वातावरण पटेना. घरी त्याला हवे ते करण्याची मुभा होती. पण तिथे तसे नव्हते. तो नंतर दिल्लीला स्थायिक झाला. त्याचे वडील राजकारणात होते. पण त्यावेळी अजय फार लहान असल्याने त्याने त्याला राजकारणात फार रस नव्हता, त्याला क्रिकेट खेळायला आवडायचे. त्यासाठी त्याने अनेकदा शाळाही बुडवली.
त्याबाबतीतील किस्सा असा की तो भारतीय विद्याभवन शाळेत होता. त्यावेळी त्याची आई त्याला बसमध्ये बसवण्यासाठी त्याच्याबरोबर बसस्टॉपपर्यंत यायची. बस येताना दिसली की ती निघून जायची. अजय आई परत घरी गेल्यावर शाळेत न जाता थेट इकडे तिकडे भटकायचा. अनेकदा नॅशनल स्टेडियमवर जाऊन बसायचा. एकदा त्याच्या परिक्षेतील गुणांबद्दलची चौकशी करण्यासाठी म्हणून त्याचे वडील शाळेत गेले, त्यावेळी त्यांना कळाले अजय तब्बल २ महिने शाळेतच गेलेला नाही. शाळेतील शिक्षकांना वाटले की अजय आजारी असल्याने येत नसावा.
त्यावर्षी ६ वीला तो नापास झाला होता. कारण त्याने परिक्षाच दिली नव्हती. अखेर त्याच्या वडीलांना तो नक्की शाळा बुडवून कुठे जातो म्हणून काळजी वाटली, त्यांनी त्याला विचारले, तू जातो तरी कुठे. त्यावर अजयने तो नॅशनल स्टेडियममध्ये जात असल्याचे सांगितले. मग त्याच्या वडीलांनी त्याला समजावले तूला जायच आहे ना तिकडे तू खूशाल जा पण शाळा सुटल्यावर जा. त्यासाठी त्यांनी अजयची आणि नॅशनल स्टेडियममध्ये प्रशिक्षक असणाऱ्या गुरचंद सिंग यांची भेटही घडवून दिली. पुढे गुरचंद सिंग यांनी अजयची कारकिर्द घडवण्यात मोठी भूमिका होती. त्यांच्या मदतीने त्याने त्याची शाळा बदलली. त्याने सरदार पटेल शाळेत प्रवेश घेतला. या शाळेत मुलांना त्यांच्या गुणवत्तेला वाव दिला जात होता. त्यामुळे अजय या शाळेत रुळला. त्याबरोबरच त्याचे क्रिकेटही सुरु होते. एकदा शालेय क्रिकेट खेळताना कपिल देव यांनी त्याला पाहिले होते. त्याआधीही १९८३ च्या विश्वचषकावेळी अजय त्यांना भेटला होता. कपिल देव यांना अजयने प्रभावित केले होते. कपिल नेहमी नॅशनल स्टेडियममध्ये यायचे त्यावेळी ते अजयला खेळताना पहायचे. त्यांनी एकदा थेट त्याला विचारले हरियाणाकडून खेळणार का? आता चक्क कपिल देव विचारतात म्हटल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. अजयने प्रशिक्षक गुरचंद सरांना विचारुन होकार दिला.
१९८८-८९मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या रणजी मोसमात त्याने ५ सामन्यात २२१ धावा केल्या. त्याला १९९० ला भारतीय संघात स्थान मिळाले होते. परंतू त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यावेळी तो १२ वी शिक्षण घेत होता. पुढे त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी सुरु ठेवली होती. अजयने नंतर पुन्हा १९९२ च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवले. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले. मात्र हा सामना पावसामुळे रद्द झाला. त्याच विश्वचषकात त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍलेन बॉर्डरचा घेतलेला भन्नाट झेल अनेकांच्या लक्षात राहिला. त्या झेलने तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असल्याचेही त्याने दाखवून दिले. त्यानंतर १० महिन्यांनी अजयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटी पदार्पणही केले.
या कालावधीमध्ये अजय ४०-६० अशा धावा करुन सातत्याने बाद होत होता. तो त्याची भारतीय संघात निवड झाली असे समजून आळशीपणा करायला लागला होता. पण नंतर त्याने स्वत:ला सुधारत दुलीप ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावले. तसेच त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच एक वादग्रस्त घटना देखील घडली होती. जमनागरमध्ये एक सामना झाला, त्यावेळी अजयने ६८ धावा केल्या होत्या. त्याच सामन्यात रवी शास्त्रींनी ५ विकेट्स काढल्या होत्या आणि ३० धावा केल्या होत्या. पण जमनागरच्या राजघराण्यातील असल्याने अजयला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे वादही झाले होते.
अजयची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ती १९९६ च्या विश्वचषकात. त्या विश्वचषकात अजयने पाकिस्तान विरुद्ध २५ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या. त्याने शेवटच्या काही षटकात तुफानी फटकेबाजी केली. त्याच्या फटकेबाजीमुळे वकार युनुसच्या शेवटच्या २ षटकात ४० धावा निघाल्या. त्यामुळे भारताला या सामन्यात ८ बाद २८७ धावसंख्या उभारली होती. अजय संघात स्थान टिकवण्यासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार असायचा. त्यामुळे त्याने त्याच्या कारकिर्दीत सलमीला, मधल्या फळीत, तळात अशी अनेक ठिकाणी फलंदाजी केली. तो एकदा स्थिर झाला की गोलंदाजांवर आक्रमण करायचा. संघात त्यावेळी मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण असे फलंदाज होते. त्यामुळे जडेजाला फलंदाजीची तशी संधी तशी कमी मिळायची. पण शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजांवर आक्रमण करण्याची सवय त्याने लावली होती. त्याच्या खेळपट्टीवर स्थिरावण्याच्या सवयीबद्दल एकदा सचिनने एक किस्सा सांगितला होता. अजय जेव्हाही दबावाखाली फलंदाजीला येतो तेव्हा तो क्षेत्ररक्षकांशी गप्पा मारायचा यामुळे त्याला खेळपट्टीवर स्थिर होण्यास मदत व्हायची. म्हणून एकदा रणजी ट्रॉफीचा सामना खेळत असताना सचिनने मुंबईच्या खेळाडूंना अजय खेळण्यासाठी येण्याआधी सर्वांना सांगून ठेवले होते की कोणीही त्याच्याशी बोलायचे नाही. पण पंचायत अशी झाली की अजयने थेट सचिनशीच गप्पा मारायला सुरुवात केली होती.
Today in @bira91's @cricketworldcup Greatest Moments we have Ajay Jadeja's cameo of 45 off 25 for India against Pakistan in the 1996 quarter-finals, 40 of them off Waqar Younis! pic.twitter.com/mV978wICnq
— ICC (@ICC) March 27, 2019
असो, पुढे १९९७ ते २००० दरम्यान त्याने १३ वनडे सामन्यात नेतृत्वही केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ८ सामने जिंकले आणि ५ सामने पराभूत झाले. अजयने केवळ फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातच कमाल केली असे नाही. एकदा त्याला त्याच्या गोलंदाजीमुळे सामनावीर पुरस्कार मिळाला होता. हा सामना १९९९ ला शारजामध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता. या सामन्यात इंग्लंडला विजयासाठी ४ षटकात २७ धावा हव्या होत्या आणि त्यांच्या हातात ३ विकेट्स होत्या. त्यावेळी अजयला अझरुद्दीनने गोलंदाजी करायला दिली. अजय तसा पार्टटाईम गोलंदाज. पण त्यादिवशी त्याने कमाल केली. त्याने टाकलेल्या त्या षटकात रॉबर्ट क्राफ्ट, फ्लेअरब्रदर आणि डॅरेन गॉफ यांना बाद केले. तेही केवळ ३ धावा देत. त्यामुळे भारताने तो सामना जिंकला. यादरम्यान नेहमी हसतमुख असणाऱ्या अजय जडेजामध्ये आणि अभिनेत्री माधूरी दिक्षितमध्ये प्रेमसंबंध असल्याच्याही चर्चा झाल्या. तसेच त्यामुळे त्याची कामगिरीही खालवली असल्याचे बोलले जात होते. त्यातच २००० च्या दरम्यान फिक्सिंग प्रकरण रंगले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि बुकीमध्ये झालेल्या संभाषणात भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनबरोबर अजय जडेजाचेही नाव आले. या प्रकरणामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वादळ आले होते. अजयतर क्रिकेटचा एवढा मोठा वारसा असणाऱ्या घराण्यातून आलेला. या प्रकरणामुळे अझरुद्दीनवर आजीवन बंदी तर अजयवर ५ वर्षांची बंदी आली. त्यामुळे अजयची कारकिर्द संपल्यातच जमा होती. पण अजयने हलचाली सुरु केल्या. अखेर दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाने २००३ ला त्याच्यावरील बंदी हटवली. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपुष्टात आली. पण त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हे प्रकरण सुरु असताना त्याने जया जेटलींची मुलगी आदिती जेटलीबरोबर लग्न केले. पुढे अजयने हरियाणा संघाचे नेतृत्वही केले. तो २०१३ पर्यंत म्हणजेच वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत देशांतर्गत क्रिकेट नियमितपणे खेळत होता. त्यानंतर त्याने प्रशिक्षक म्हणूनही काम केले. आता बऱ्याचदा तो समालोचक म्हणूनही दिसतो. अजयबाबत आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्याला मल्याळम, गुजराती, पंजाबी, हिंदी, मराठी यांसारख्या अनेक भाषा बोलता येतात.
भारतीय संघाचा अष्टैपलू रविंद्र जडेजा व अजय जडेजा यांच्यात कोणतेही नाते नाही. एकदा रविंद्र जडेजा गोलंदाजी करुन सिमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा एका चाहत्याने त्याला ‘चांगली गोलंदाजी केलीस अजय’ असे म्हटले होते. यावर रविंद्र जडेजाने ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. व ९ वर्ष क्रिकेट खेळूनही लोकांना जर क्रिकेटपटू लक्षात रहात नसतील तर अवघड आहे असे म्हटले होते. दुसऱ्या बाजूला अजयलाही या गोष्टीचा त्रास होतो. अनेक वेळा युवा चाहते जेव्हा जडेजाला भेटायला येतात व ते अजय नाही तर रविंद्र म्हणतात तेव्हा अजयला याचे वाईट वाटते.
अजयची जेवढी वनडे कारकिर्द बहरली तेवढी कसोटी कारकिर्द बहरली नाही. वनडेत त्याने १९६ सामन्यात ५३५९ धावा केल्या. तर कसोटीत मात्र त्याने १५ सामनेच खेळले. मात्र फिक्सिंग प्रकरण झाले आणि २९ व्या वर्षीच त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपली. त्याच्याकडे कोणत्याही क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करणारा चांगला फलंदाज, निडर क्षेत्ररक्षक आणि भविष्यातील एक कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिले गेले होते. पण केवळ एका घटनेमुळे त्याच्या कारकिर्दीला मोठे ग्रहण लागले. त्यामुळे जेव्हाही त्याच्याबद्दल चर्चा होईल, त्यावेळी फिक्सिंगबद्दल बोलले जाईल, हेच त्याचे दुर्दैव आहे.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण