गोष्ट आहे अशा भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटूची ज्याला पुढचा सचिन तेंडुलकर, कपिल देव म्हटलं गेलं होतं. ज्याने त्याची आंतराष्ट्रीय कारकिर्द झोकात सुरु केली होती. तो भारताचा वनडेत सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा गोलंदाज एवढेच नाही तर वनडेत सर्वात जलद अर्धशतक करणारा भारतीय फलंदाजही ठरला. तो वेगात यशाच्या शिखरावर पोहचवला पण तितक्याच वेगान नंतर तो भारतीय क्रिकेट संघातून नाहीसाही झाला. अवघ्या 9 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द पण तरीही तो अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ नंतरचा वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज. तो क्रिकेटपटू म्हणजे मुंबईचा अजित आगरकर.
भारतीय क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईत 4 डिसेंबर 1977 ला अजितचा जन्म झाला. त्यामुळे क्रिकेटची आवड लहानपणापासूनच त्याला लागलेली. त्याने फलंदाज बनाव असं त्याच्या वडीलांना वाटायचं. त्यासाठी ते त्याला रमाकांत आचरेकर सरांच्याकडे घेऊन गेले. तेव्हा अजितच वय होत 11-12 वर्षे. त्यासाठी त्याने 6 वीत असताना शारदाश्रम शाळेत प्रवेशही घेतला. त्यावेळी आचरेकर सर म्हणजे सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आम्रे अशा खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून नावारुपाला येत होते. त्याने एक फलंदाज म्हणून आचरेकर सरांकडून धडे गिरवायला सुरुवात केली होती. तो शिवाजी पार्क येथे सराव करायचा. त्यावेळी तो बऱ्याचदा त्याच्या आजी आजोबांकडे रहायचा. ते शिवाजी पार्कच्या जवळ रहायचे.
अजितने त्यावेळी हळू हळू शालेय क्रिकेटमध्ये एक चांगला फलंदाज म्हणून नाव गाजवायला सुरुवात केली होती. त्याने मुंबईत मानाचा मानल्या जाणाऱ्या जाईल्स शिल्ड शालेय स्पर्धेत वयाच्या 15 व्या वर्षी त्रिशतक केले. त्यानंतर त्याने हॅरिस शिल्ड 19 वर्षांखालील स्पर्धेतही त्याचा हाच फॉर्म कायम ठेवत धावांचा पाऊस पाडला. त्यावेळी त्याला आचरेकर सरांच्या हाताखाली तयार झालेला पुढचा सचिन तेंडुलकर असं लोक म्हणू लागले होते. त्याने मुंबई संघात पदार्पण करण्याआधीच त्याच्या नावाची चर्चा करायला सर्वांना भाग पाडलं होते. या दरम्यान त्याची 1994 मध्ये 17 वर्षांखालील भारतीय संघातही निवड झाली होती. तो 17 वर्षांखालील भारतीय संघाकडून 17 वर्षांखालील इंग्लंड संघाविरुद्ध खेळला होता. त्या संघात अँड्र्यू फ्लिंटॉफ देखील होता. त्यावेळी एक चांगला फलंदाज आणि कधीतरी वेळपडली तर वेगवान गोलंदाजी करणारा क्रिकेटपटू अशी अजितची ओळख होती. वयोगटातील क्रिकेट खेळत असताना त्याला कोणीतरी सांगितले की फक्त फलंदाजी करुन तूझी मुंबई संघात निवड होणार नाही. त्यानंतर अजितच्या मनाने अष्टपैलू क्रिकेटपटू बनण्याचा विचार पक्का केला. त्याने त्याच्या गोलंदाजीवर काम करायला सुरुवात केली. लवकरच वयाच्या 18व्या वर्षी अजितने मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवले. त्याने 1997 ला 19 वर्षांखालील भारतीय संघातही स्थान मिळवले. त्या वेळी त्याने 19 वर्षांखालील भारतीय संघाकडून श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले.
साल 1998 ला त्याची ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या तिरंगी वनडे मालिकेसाठी वरिष्ठ भारतीय संघात निवड झाली. त्याने पहिल्याच सामन्यात ऍडम गिलख्रिस्टची विकेट मिळवली. त्याने नंतर त्याच्या तिसऱ्याच वनडे सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी सुरुच होती. त्याचा रिव्हर्सस्विंग प्रभावी ठरत होता. त्याने पुढच्या 23 वनडेत 50 विकेट्स पूर्ण करत त्यावेळी वनडेत सर्वात जलद 50 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. एवढेच नाही त्याने 2000 साली झिम्बाब्वे विरुद्ध 21 चेंडूत अर्धशतक ठोकत वनडेत भारताकडून सर्वात जलद अर्धशतक करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे पांढऱ्या कपड्यांमध्ये खेळला गेलेला तो शेवटचा वनडे सामना होता. त्यामुळे त्याला अनेक जण भारताचा पुढचा कपिल देव म्हणू लागले.
एव्हाना अजितने कसोटी क्रिकेटमध्येही स्थान मिळवले होते. पण त्याच्या दुसऱ्याच कसोटीत 1999 ला तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेडला दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला. त्याच्या पुढच्या दोन्ही कसोटीतही तो सर्व डावात शून्यावर बाद झाला. इतका खराब त्याचा हा दौरा होता. एवढेच नाही 2001 ला ऑस्ट्रेलिया भारतात आली असताना तो तेव्हाही तो मुंबईतीस सामन्यातील दोन्ही डावात शून्यावर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग 7 वेळा शून्यावर बाद होण्याचा नकोसा विक्रमही त्याने केला. याच विक्रमामुळे त्याला ‘बॉम्बे डक’ हे नाव पडले.
याचदरम्यान त्याच्यातील आणि त्याचा मुंबईतील मित्र मझहरची बहीण फातिमा यांच्यातील प्रेमसंबंध फूलू लागले होते. मझहरही मुंबईकडून क्रिकेट खेळायचा आणि अजितचा चांगला मित्र होता. त्याच्याबरोबर फातिमा अनेकदा असायची. त्याचमुळे अजित आणि फातिमाची ओळख झाली होती. पुढे लगेचच 2002 ला त्यांनी कुटुंबाच्या संमतीने लग्न केले.
अजित त्याच्या गोलंदाजीबरोबरच त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाऊ लागला होता. ज्या मैदानाला क्रिकेटची पंढरी म्हटलं जात त्या लॉर्ड्सच्या मैदानात अगरकरने 2002 साली शतक ठोकलं. जो कारनामा सचिन, पाँटिंग सारख्या दिग्गजांनाही कधी करता आलेला नाही. इंग्लंडने दिलेल्या 568 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची आवस्था 170 धावांवर 6 बाद अशी असताना तो फलंदाजीला आला होता. त्याने व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबर 126 धावा जोडल्या. 334 वर 9 विकेट्स असताना त्याने नेहराला बरोबरीला घेत 63 धावा केल्या. यावेळी त्याने नाबाद 109 धावा केल्या होत्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकमेव शतक आहे.
पुढे अजितने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 7 वेळा शुन्यावर बाद होण्याचा बदला 2003-04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घेतला. त्याने ऍडलेडला पार पडलेल्या सामन्यात पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या पण दुसऱ्या डावात त्याने कमाल केली. त्याने दुसऱ्या डावात जस्टिन लँगर, रिकी पाँटिंग, सिमॉन कॅटिच अशा फलंदाजांना बाद करत 41 धावात 6 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलिया संघ 196 वर सर्वबाद झाला. या सामन्यात नंतर द्रविडच्या शानदार खेळीने भारताने धावांचे लक्ष्य पूर्ण करत सामना जिंकला. त्यावेळी तब्बल २ दशकांनी भारताने ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना जिंकला होता. या सामन्यानंतर मात्र कधीही अजितला एका कसोटी डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेता आल्या नाही. त्याच दौऱ्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्नला झालेल्या वनडे सामन्यात 6 विकेट्स घेत वनडेतील सर्वोत्तम कामगिरी केली. दरम्यान तो 2004 ला मिडलसेक्सकडून काऊंटी क्रिकेटही खेळला.
मात्र अजित कसोटी क्रिकेटमध्ये कधी त्याचे स्थान पक्के करु शकला नाही. तो सातत्याने कसोटी संघात ये-जा करत राहिला. त्यामानाने तो वनडेतील 2006 पर्यंतचा नियमित सदस्य होता. पुढे तो सर्वात जलद वनडेत 1000 धावा आणि 200 विकेट्स घेणारा क्रिकेटपटूही झाला होता. त्याने १३१ वनडेत हा कारनामा केला होता. मात्र त्यानंतर त्याला दुखापतींबरोबरच त्याच्या फॉर्मने त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्याकडून सातत्यपूर्ण कामगिरी होत नव्हती. धावाही त्याच्या बॅटमधून निघत नव्हत्या. त्यात तो खूप धावा देऊ लागला. पण तरीही या दरम्यान तो 2003, 2007 चे विश्वचषकही खेळला.
अजित तसा थोडा रागिट क्रिकेटपटू. त्याचा प्रत्यय सर्वांना 2006 च्या पाकिस्तान दौऱ्यात आला. त्याच्याबाबतील एक किस्सा असा की लाहोरमध्ये सामना होता. त्यावेळी खेळपट्टीबद्दल अनेक चर्चा झाल्या होत्या. त्यात पिच क्यूरेटर आगा जाहिद हे होते. ते स्वभावाने थोडे तिरकस होते. त्यांनी खेळपट्टी पहाण्यासाठी जाण्यास मज्जाव केला होता. एकदा असाच सामन्याआधी अजित खेळपट्टीचा अंदाज घेण्यासाठी म्हणून गेला. मात्र त्याला खेळपट्टी तपासू दिली नाही. त्यामुळे तो परत आला. तो चिडला होता. नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत असताना त्याने मोठे मोठे फटके मारायला सुरुवात केले. त्याचे फटके इतके मोठे होते की चेंडू खेळपट्टीच्या जवळ काम करणाऱ्या ग्राऊंडस्टाफच्या इथे जात होते. अखेर आगा जाहिद त्याच्याशी भांडण्यासाठी आले आणि त्यांनी त्याला असे फटके मारु नको सांगितले. अजितही इरेला पेटला होता. त्यानेही त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद प्रचंड वाढला. शेवटी सचिन तेंडुलकरला मधे पडावे लागले. त्याने अजितला मागे खेचत कसेबसे समजावले. तेव्हा कुठे हे प्रकरण मिटले.
साल 2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यातच अजित शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर तो कसोटीत कधीही दिसला नाही. २००७ मध्ये तो वनडे खेळला. पण तेही वनडे कारकिर्दीतील त्याचे शेवटचे वर्ष. 2007 मध्ये तो पहिल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवलेल्या भारतीय संघाचाही भाग होता. गमतीचा भाग म्हणजे 29 वर्षांचा असलेला अजित त्या संघातील सर्वात वयस्कर खेळाडू होता. पण एव्हाना संघात इरफान पठाण, आरपी सिंग, श्रीसंत यांनी स्थान पक्के करायला सुरुवात केली होती. त्यात संघात झहिर खान, हरभजन हे अनुभवी गोलंदाज होतेच. त्या सर्वांपुढे अजितला टिकाव धरणे कठीण गेले. त्याचा प्रोब्लेम असा होता की तो षटकातील 5 चेंडू चांगले टाकायचा आणि त्याच्या एखाद्या चेंडूवर बाऊंड्री जायची. अखेर 2007 ला तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यानंतर त्याला कधीही भारतीय संघात घेण्यात आले नाही.
असे असले तरी अजित मुंबई संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत होता. 2011 ला त्याला मुंबई संघातून ओडीसा विरुद्धच्या सामन्यातून डच्चू देण्यात आला. या निर्णयाने चिडलेल्या अजितने कटकवरुन थेट मुंबई गाठले होते. हे प्रकरणामुळे देखील त्यावेळी थोडा वाद झाला होता. पण 2012 मध्ये त्याने पुन्हा मुंबई संघात विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी स्थान मिळवले आणि तेही कर्णधार म्हणून. तसेच त्याला पुन्हा एकदा रणजीसाठी मुंबईचे कर्णधारपद मिळाले. त्याने 2012-13 ला मुंबईला कर्णधार म्हणून 40 वे रणजी ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले. त्यानंतर मात्र तो स्पर्धात्मक क्रिकेट खेळला नाही. 2013 ला त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या दरम्यान तो कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेविल्स संघाकडूनही आयपीएल खेळला. पण त्याला त्यात म्हणावी तशी छाप पाडला आली नाही. 42 सामन्यात त्याला 29 विकेट्स आणि 179 धावाच करता आल्या.
निवृत्तीनंतर अजितने क्रिकेट प्रशासनात उतरण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्या या कारकिर्दीला थोडी वादाची किनार लाभली. तो मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवड समीतीत असताना काही युवा खेळाडूंना संघात स्थान न दिल्याने वाद झाले. अखेर त्याने त्या पदाचा राजीनामा दिला. याच कालावधीत त्याने अनेकदा एमएस धोनीवर केलेल्या टीकेमुळेही त्याला ट्रोल करण्यात आले. क्रिकेटव्यतिरिक्त गोल्फ खेळायला आवडणारा अजित सध्या समालोचन करताना दिसतो. तसेच नुकतेच त्याने वरिष्ठ भारतीय संघाच्या निवड समितीमध्येही काम करण्याची इच्छा दाखवली होती.
अजित हा एक प्रतिभाशाली खेळाडू नक्कीच होता. त्याने केवळ 9 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना वनडेत 191 सामन्यात 288 विकेट्स घेतल्या. पण तो नेहमीच अंडररेटेड खेळाडू राहिला, ज्याने क्रिकेटप्रेमींना सातत्याने नाही पण नेहमीच लक्षात राहतील असे क्षण दिले. त्याच्या कारकिर्दीपेक्षाही त्याने काही मोजक्या क्षणी केलेल्या शानदार कामगिरीमुळे तो नेहमीच लक्षात राहिल.
-प्रणाली कोद्रे
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण