मार्च 2018मध्ये त्याने निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बांगलादेश विरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार मारुन भारताला विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या या षटकाराने तो एका रात्रीत स्टार झाला. सगळीकडे त्याची चर्चा व्हायला लागली. तो खेळाडू होता दिनेश कार्तिक. त्याने भारतीय संघात 2004 ला पाऊल ठेवलं होत पण त्याच्या नावाची इतकी चर्चा होण्यासाठी त्याला तब्बल 14 वर्षांची वाट पहावी लागली. अशात गुरुवारी (दि. 1 जून) कार्तिक वयाच्या 38वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आपण त्याच्या आयुष्याविषयी जाणून घेऊयात…
चेन्नईमध्ये 1 जून 1985 ला जन्मलेल्या दिनेशची लहान वयातच्या त्याच्या वडिलांनी क्रिकेटशी ओळख करुन दिली होती. त्याचे वडील स्वत: क्रिकेट खेळले होते. पण पालकांच्या आग्रहास्तव शिक्षणाकडे लक्ष द्यायचे म्हणून त्यांनी क्रिकेटकडे दुर्लक्ष केले. पण दिनेशच्या बाबतीत असे होऊ द्यायचे नाही असे त्यांनी ठरवले. त्यामुळे ते दिनेश लहान असतानाच त्याच्याबरोबर लेदर बॉलने क्रिकेट खेळायचे. हळूहळू दिनेश चेन्नईमध्ये शालेय क्रिकेटमध्ये चमकू लागला होता. त्याच्या वडीलांच्या नोकरीमुळे दिनेशला लहानपणी सातत्याने शाळाही बदलाव्या लागल्या. तो दोनवर्षे कुवेतमध्येही राहिला होता. त्यामुळे तो कधी या शाळेकडून तर पुढीलवर्षी दुसऱ्या शाळेकडून खेळताना दिसायचा. त्याने जवळ जवळ 14 शाळा बदलल्या होत्या.
पुढे तो 16 वर्षांखालील 19 वर्षांखालील संघातही खेळायला लागला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला 17व्या वर्षीच प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्याने 2002 ला तमिळनाडूकडून बडोदा विरुद्ध प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केले. त्याने 2002-03 च्या रणजी मोसमात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना 5 सामन्यात 179 धावा केल्या. पण त्याच्या पुढच्याच मोसमात त्याने कामगिरी उंचावत 6 सामन्यात 438 धावा केल्या. त्यावेळी त्याने 2004 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थानही मिळवले. त्या विश्वचषकात त्याने श्रीलंकेविरुद्ध महत्त्वपूर्ण 70 धावांची खेळी केली होती. त्याचदरम्यान भारतीय संघ एका यष्टीरक्षक फलंदाजाच्या शोधात होता. भारतीय संघाने पार्थिव पटेल, अजय रात्रा, समीर दिघे, दिप दासगुप्ता या सर्वांना संधी देऊन पाहिली होती. त्यामुळे अखेर 2004 मध्ये इंग्लंड दौऱ्यासाठी 19 वर्षीय दिनेशला भारतीय संघात संधी मिळाली. त्यानेही भारतीय संघात पदार्पण केले ते क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानात. पण युवा दिनेशने पदार्पणाच्या सामन्यातच अनिल कुंबळेच्या चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉनचा झेल सोडला. पण नंतर त्याने त्याच सामन्यात वॉनला यष्टीचीतही केले.
त्याच्या वनडे कारकिर्दीच्या सुरुवातीचाच गमतीचा किस्सा असा की 2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारत- पाकिस्तान सामना सुरू होता. त्यावेळी आधीच तो सामना हायवोल्टेज. त्या सामन्यात पाकिस्तानची एक महत्त्वाची विकेट गेल्यानंतर भारतीय संघ चर्चा करत होता. त्या सामन्यात दिनेशला संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे तो पाणी घेऊन मैदानात येत होता. तो येत असताना गवतामुळे त्याला तोल सांभाळता आला नाही आणि तो पाठमोऱ्या असणाऱ्या कर्णधार गांगुलीच्या अंगावर आदळला. तेव्हा त्याला पाहून आधीच वैतागलेला गांगुली म्हणाला होता, ‘कोण आहे हा, कुठून कुठून शोधून आणतात रे यांना’, 2004 मध्येच दिनेशला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, त्याची कामगिरी चांगली होत नव्हती. त्याला 2004 मध्येच वनडे संघातून वगळण्यात आले. त्याची कसोटीतील कामगिरीही खास नव्हती. त्याला पहिल्या 10 कसोटीमध्ये केवळ एक अर्धशतक करता आले होते.
याच दरम्यान एमएस धोनीने मिळालेल्या संधीला दोन्ही हातांनी पकडले आणि संघातील जागा पक्की केली. त्यामुळे दिनेशसाठी पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण जात होते. दिनेश पुन्हा देशांतर्गत क्रिकेटकडे वळला. त्याने तमिळनाडूकडून सलामीला फलंदाजीला सुरुवात केली. त्यामुळे त्याला पुन्हा 2006 मध्ये भारतीय संघात संधी मिळाली. त्यानंतर तो काही काळ नियमितपणे भारतीय संघात खेळला. त्याची 2007 च्या विश्वचषकासाठीही भारतीय संघात निवड झाली. परंतू धोनी भारतीय संघाचा मुख्य यष्टीरक्षक असल्याने कार्तिकला खेळण्याची संधी मिळालीच नाही. त्यानंतर त्याला 2007 च्या इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाली. त्यावेळी विरेंद्र सेहवागला संघातून वगळण्यात आले होते. दिनेशने इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाने मिळवलेल्या कसोटी विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता. तो कसोटी मालिकेत भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता, पण त्यानंतर काही दिवसातच त्याला पुन्हा भारतीय संघातून वगळण्यात आले.
याचदरम्यान त्याने 2007 ला चेन्नईमध्ये 21व्या वर्षीच त्याची बालमैत्रीण निकीता वंजाराशी लग्न केले. दोन्ही परिवार एकमेकांना चांगले ओळखत असल्याने त्यांनी लवकर विवाह केला. 2007 नंतरची 3 वर्षे तो भारतीय संघात ये-जा करत राहिला. या काळात तो तमिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला. त्याने तमिळनाडूचे नेतृत्वही करायला सुरुवात केली. एव्हाना धोनी भारतीय संघाचा कर्णधार झाला होता. त्यामुळे दिनेश समोरचा मार्ग आणखी कठिण झाला होता. धोनी यष्टीरक्षक कर्णधार असल्याने तो संघात नियमित होता. 2010 नंतर मात्र पुढचे तीन वर्षे दिनेशला भारतीय संघात स्थानच मिळाले नाही.
याचकालावधीत 2012ला भारतीय कसोटीपटू मुरली विजयशी आपल्या पत्नीचे संबंध असल्याचे लक्षात आल्यावर कार्तिकने निकीताबरोबर घटस्फोट घेतला. वैयक्तित आयुष्यात आलेल्या वादाळचा सामना करत असताना 2013 ला त्याने आयपीएलमध्ये 510 धावा केल्या. तसेच 2012-13च्या रणजी मोसमात त्याने 8 सामन्यात 577 धावा करत पुन्हा एकदा त्याची दखल घ्यायला सर्वांना भाग पाडले. त्याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. त्याला 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी मिळाली. पण त्यातही त्याला प्रभाव पाडण्यात अपयश आले. पण नंतर त्याचवर्षी त्याला धोनीला विश्रांती देण्यात आल्याने झिम्बाब्वे दौऱ्यात संधी मिळाली. मात्र त्यानंतर पुन्हा तो भारतीय संघातून बाहेर पडला.
आयपीएलमधील त्याला मिळणारी किंमतही कमी होत गेली. 2014ला 12.5 कोटी मिळालेल्या दिनेशला 2015ला आरसीबीने 10.5 कोटी रुपयांना खरेदी करत संघात घेतले. पण त्यानंतर पुढच्याच मोसमात त्याला त्यांनी मुक्त केले. त्यानंतर त्याला गुजराज लायन्सने 2016ला 2.3 कोटी रुपयांना खरेदी केले. एवढी कमी किंमत मिळालेली पाहून दिनेश नाराज झाला. त्याच्या लक्षात आले की आता हळूहळू आपली किंमत कमी होत जाणार. त्यामुळे त्याने त्याचा 16 वर्षांखालील क्रिकेट खेळत असतानापासूनचा मित्र अभिषेक नायरची मदत घ्यायची ठरवली. मुंबईत राहणाऱ्या नायरने त्याच्याआधी अनेक क्रिकेटपटूंना मदत केली होती. त्याने 2011 च्या विश्वचषकाआधी संघर्ष करणाऱ्या रोहित शर्मालाही मदत केली होती. त्याच्या मदतीने रोहितने भारतीय संघात नंतर पुनरागमन केले होते. नायरने श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर यांनाही मुंबईकडून खेळताना मार्गदर्शन केले आहे.
दिनेशच्या बाबतीतील एक किस्सा म्हणजे रोहितने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात दिनेशच्या बॅटने फलंदाजी केली होती. रोहितने पहिले अर्धशतकही कार्तिकने दिलेल्या बॅटने केले होते. एवढेच नाही तर 2012 ला 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताचा कर्णधार असणाऱ्या उन्मुक्त चंदनेही दिनेशचीच बॅट वापरुन अंतिम सामन्यात शतक ठोकले होते आणि भारताला विश्वविजेतेपद मिळवून दिले होते.
असो, नायर 2016 मध्ये दिनेशचा गुरु बनला. दिनेश नायरच्या पवई येथे असलेल्या घरी रहायला आला. मुंबईतील लहान घरात रहाण्याचा दिनेशचा हा पहिलाच अनुभव. तो पहिल्यांदा छोटे घर पाहुन आश्चर्यचकित झाला. तिथे त्याला नायरने स्वत:च्या गोष्टी स्वत: करायला लावल्या. त्याच्याकडून नायर छोट्याछोट्या गोष्टी करुन घ्यायला लागला. त्याला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करु लागला. ज्या गोष्टी दिनेशच्या कंफर्ट झोनच्या बाहेर होत्या त्या सर्व नायरने त्याला करायला लावल्या. नायर त्याला अमित पगनिस, अपूर्व देसाई अशा स्थानिक प्रशिक्षकांकडेही घेऊन गेला. त्याचा फायदा दिनेशमध्ये दिसायला लागला. दिनेशने पुढच्याच देशांतर्गत मोसमात ७०४ धावा १४ डावात केल्या. तसेच त्याने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 9 सामन्यात 607 धावा केल्या. त्यामुळे त्याला 2017 ला झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात पुन्हा संधी मिळाली.
साल 2014 नंतर तो 3 वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करत होता. यादरम्यान त्याला आंतरराष्ट्रीय स्क्वॅशपटू असलेली त्याची पत्नी दिपिका पल्लीकलचा मोठा पाठिंबा मिळाला होता. पहिल्या लग्नानंतर वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळानंतर 2013 मध्ये दिपिका त्याच्या आयुष्यात आली होती. 2014 ला राष्ट्रकुल स्पर्धेत दिपिकाला पाठिंबा देण्यासाठीही दिनेश ग्लासगोला गेला होता. तिथे तिने जोत्सना चिनप्पासह खेळताना सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यांनी 2015 ला लग्न केले. दिपिकाच्या आगमनाने दिनेश मानसिकरीत्यापण स्थिर झाला होता. त्याला तिचा भक्कम पाठिंबा मिळत आहे. विशेष म्हणजे दिपिकाला क्रिकेटपटूंचा त्यांना मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे तिटकारा होता. पण तिने दिनेशची मेहनत पाहिली होती. पण ती त्याचा सामना पहायला मात्र फार क्वचित उपस्थित राहिली आहे.
साल 2017 नंतर तो राखीव यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघात होता. 2018 मध्ये त्याला तब्बल 8 वर्षांनी कसोटी सामनेही खेळायला मिळाली. तो 2018मध्ये 3 कसोटी सामने खेळला. त्यानंतर मात्र त्याला कसोटीत संधी मिळाली नाही. कसोटीत वृद्धिमान सहा आणि रिषभ पंतने जागा पक्की केली. पण दिनेशसाठी 2018 हे वर्ष तसं खास ठरलं. विराट, धोनी अशा मुख्य खेळाडूंंच्या अनुपस्थित भारतीय संघ निदाहास ट्रॉफी खेळण्यासाठी श्रीलंकेला गेला होता. त्या मालिकेत भारताची बेंचस्ट्रेंथची परिक्षा होती. कारण पुढे 2019चा विश्वचषक होता. याचवेळी कार्तिकने चांगल्या यष्टीरक्षणाबरोबर भारताला अंतिम सामना जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. 2018 मध्ये दिनेश टी20 संघात नियमित सदस्य होता. यादरम्यान त्याला केकेआर संघाचे नेतृत्वही करायला मिळाले. मात्र 2019 च्या आयपीएलआधी त्याला अचानक ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतून वगळण्यात आले. त्यामुळे अनेकांना वाटले त्याला 2019 च्या विश्वचषकात संधी मिळणार नाही. पण त्याच्या यष्टीरक्षणाच्या कौशल्यामुळे त्याला संधी मिळाली.
साल 2007 ला विश्वचषकात संधी मिळूनही खेळायला न मिळालेल्या दिनेशला पुन्हा एकदा विश्वचषकात खेळण्याची संधी चालून आली होती. पण त्याला मोक्याच्या क्षणी छाप पाडता आली नाही. परिणामत: त्याला पुन्हा भारतीय संघातून डच्चू मिळाला. त्यानंतर मात्र त्याला अजून तरी संघात संधी मिळालेली नाही. अनेकदा संधी मिळूनही ती संधी दवडल्याने दिनेशचे कारकिर्दीत मोठे नुकसान झाले. पण त्यानेही अनेकदा पुनरागमन करुन त्याच्यातील जिद्द कायम ठेवली. मात्र त्याने योग्यवेळी योग्य संधीचा फायदा न घेतल्याने प्रतिभावान असूनही कायमच संघात राखीव यष्टीरक्षक म्हणूनच राहिला.
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण