जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) मेगा लिलाव (Mega Auction) बेंगलोर येथे १२ व १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लिलावात अनेक युवा खेळाडूंना मोठ्या रकमा मिळाल्या. याच सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावलेल्या काही खेळाडूंना कोणी बोली लावली नाही. नेहमी युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने या लिलावात अनेक गुणवान खेळाडू विकत घेतले. त्यामध्ये मध्यप्रदेशचा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन (Kuldeep Sen) याचा देखील समावेश आहे. त्याच कुलदीपविषयी आपण जाणून घेणार आहोत.
सहा फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या कुलदीपने २०१८-२०१९ मध्ये मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफीतून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नोव्हेंबर २०१८ मध्ये पंजाबविरुद्ध त्याने पहिल्यांदा एका डावात पाच विकेट घेतल्या होत्या. त्याच्या पहिल्याच रणजी मोसमात त्याने आठ सामन्यांत २५ बळी घेतलेले. तो मध्य प्रदेशमधील रेवाचा रहिवासी आहे. आयपीएल संघाचा भाग बनणारा ईश्वर पांडेनंतर रेवाचा तो दुसरा क्रिकेटपटू ठरला. कुलदीप हा मूळचा रेवा जिल्ह्यातील हरिहरपूर गावचा आहे. त्याचे वडील रामपाल सेन हे रेवा येथील सिरमौर चौकात केस कापण्याचे दुकान चालवतात.
कुलदीप याच्या वडिलांना त्याचे क्रिकेट खेळणे पसंत नव्हते. ते नेहमी त्यासाठी त्याला मारत असत. मात्र, आता कुलदीपने नाव कमावल्यानंतर त्यांना त्याचा अभिमान वाटत आहे. त्याचे प्रशिक्षक एरियल अँथनी व माजी क्रिकेटपटू ईश्वर पांडे (Ishwar Pandey) यांनी त्याला नेहमी मार्गदर्शन व मदत केली आहे. अँथनी यांनी सुरुवातीच्या काळात त्याच्याकडून कोणतीही प्रशिक्षण फी घेतली नव्हती. तर, ईश्वर पांडे याने त्याला सर्वप्रथम क्रिकेट शूज घेऊन दिले होते. सलग तीन वर्ष आयपीएल संघांसाठी ट्रायल दिल्यानंतर त्याची आता राजस्थान संघात निवड झाली आहे.
कुलदीप हा सातत्याने १४० किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करू शकतो. दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची त्याची कला आहे. तसेच तो उत्तमरितीने कटर गोलंदाजी करण्यातही माहिर आहे.
महत्वाच्या बातम्या-