-आशुतोष रत्नपारखी
आपल्याकडे रोजच्या वापरातली एखादी वस्तू असते. दुर्लक्षित इतकी कालांतराने आपण तिला विसरूनही जातो. नेहमी वापरुनही ती नेहमीच दुर्लक्षीत. अशीच अनेक वर्षे निघून जातात आणि अचानक समोर येताच आपण चमकतोच! त्याचबरोबर अनेक गोष्टी डोळ्यासमोर झरझर येतात, अनेक वेळेस सहाय्याला आलेली असते ती हेही आठवतं! आपल्याला तिचे महत्व कळते.
असेच अनेक “उपेक्षित” क्रिकेटमध्येही होते आणि आहेत. रॉस टेलर त्या सर्वांमध्ये कदाचित सर्वात श्रेष्ठ उपेक्षित असावा. न्यूझीलंडकडून खेळणं हेच मुळात जास्त प्रसिद्धी पासून दूर असलेली गोष्ट. म्हणजे ते काही वाईट आहे असे नाही, परंतु भारताकडून क्रिकेट खेळणे आणि न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळणे यात नक्कीच मोठा फरक नक्कीच राहतो.
या सगळ्यात रॉस टेलर मात्र एखाद्या कठोर तपस्वी ऋषी प्रमाणे वाटावा असा. त्याचा जन्म न्यूझीलंडच्या उत्तर बेटावरील लोअर हट, प्रांतातील. रॉस मिश्रवंशीय आहे, म्हणजे त्याची आई “समोअन” वंशाची आदिवासी, तर वडील गौरवर्णीय. २००६ मध्ये रॉसने न्यूझीलंडकडून पदार्पण केले. तो काळ जागतिक क्रिकेटमधील अनेक संघांतील स्थित्यंतराचा काळ. तेव्हा अनेक बदल घडत होते. नवीन खेळाडू येत होते, ट्वेन्टी-ट्वेन्टी नामक वेगवान खेळाचा उदय होत होता. न्यूझीलंड संघाला खर तर त्यावेळी अनेक वर्षे स्टीफन फ्लेमिंगचे उत्कृष्ट नेतृत्व लाभले होते.
फ्लेमिंग त्याच्या कारकिर्दीच्या अंताला आला होता. त्याचबरोबर एक महान न्यूझीलंड क्रिकेट पिढीचाही तो अंत होता. नेथन अॅस्टल्, ख्रिस केर्न्स, ख्रिस हॅरीस, अॅडम परोरे वगैरे जुने जाणते नुकतेच किंवा काही काळापूर्वी निवृत्त झाले होते. रॉस टेलरचे पदार्पण हे या कालखंडात झाले. उपरोक्त अनेकजण निवृत्त झाले किंवा होत होते तरीही स्कॉट स्टायरीस, जेकब ओरम, शेन बॉण्ड आणि अर्थातच डॅनियल व्हेटोरी हे अजूनही संघात होते. यानंतर ब्रॅण्डन मॅक्युलम, मार्टिन गप्टील, केन विल्यम्सन सारखे नवनवे खेळाडू संघात येत राहिले. रॉस या सगळ्या स्थित्यंतराचा मूक नसला तरी महत्वाचा साक्षीदार होता.
त्याची स्वतःची कामगिरी चांगली म्हणावी अशी होती. तो अतिशय उत्कृष्ट आक्रमक फलंदाजी करत होता. न्यूझीलंडच्या वरच्या फळीतील, विशेषतः ३-४ क्रमांकाचा तो अत्यंत महत्वाचा फलंदाज झाला होता. अर्थात केवळ आक्रमक फलंदाजी हेच त्याचे कारण नव्हते, संघाला गरज असताना अनेक वेळा खेळपट्टीवर नांगर टाकून तो बसत आलाय. २०११ च्या विश्वचषकात त्याने पाकिस्तान विरुद्ध अत्यंत देखणे शतक झळकावले होते, वाढदिवस होता त्याचा त्यादिवशी. हा विक्रम करणारा तो, सचिन, कांबळी, जयसूर्या नंतरचा केवळ चौथा फलंदाज ठरला!! Quite uniqe record it is.. Isn’t it?
अधूनमधून कालौघात त्याच्याकडे संघाची कप्तान पदाची जबाबदारीही येत राहिली. ते चालू असतानाच त्याचा धावांचा रतीब चालूच होता. पाकिस्तान विरुद्ध त्याने केलेल्या ११७ धावा हे न्यूझीलंडचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शंभरावे एकदिवसीय शतक. तसेच २०१४-१५ ऑस्ट्रेलिया टूर वर त्याने विक्रमांचा रतीबच घातला. ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक धावसंख्या, द्विशतक करणारा पहिला न्यूझीलंड खेळाडू, ५,००० कसोटी धावा असे रेकॉर्ड त्याने केले. पुन्हा हे सगळं करूनही फारसे काही कौतुकाचे दोन शब्द किंवा एखादा पेपरमध्ये छापून आलेला लेख वगैरे काही त्याच्या वाट्याला आले नाही. तरीही क्रिकेटमधील हा “नगण्य उपेक्षित” त्याचे काम हूं का चू न करता करत होता..!
२०१९ च्या विश्वचषकात त्याने ८,००० एकदिवसीय धावा पूर्ण करताना स्टीफन फ्लेमिंगला मागे टाकत सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड मोडला. हा “नगण्य उपेक्षित” आता न्यूझीलंडचा सार्वकालिक रन स्कोरर झाला होता. संघातील ज्येष्ठ खेळाडू झाला होता. तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये तो कारकिर्दीतील १०० वी कसोटी खेळला. त्याचबरोबर तो ब्रॅण्डन मॅक्युलम आणि स्टीफन फ्लेमिंगच्या पंगतीत जाऊन बसला…! शतक पूर्ण झाल्यावर बॅट उंचावण्याबरोबरच जीभ बाहेर काढण्याचेही त्याची अनोखी पध्दत आहे… त्याच्या लहान मुलीला ते आवडलं होतं सुरुवातीला… तेव्हापासून हे त्याचे नेहेमीचेच सेलिब्रेशन!!
जानेवारीत भारताचा न्यूझीलंड दौरा चालू असताना एकदिवसीय, कसोटी आणि टी-ट्वेन्टी सिरीज मध्ये संघात होताच तो… नेहेमीप्रमाणे. याच सिरीजमध्ये खेळताना १०१ कसोटीचा टप्पा त्याने पार केला होता. एकदिवसीय सामन्यांची संख्या तर केव्हाच दोनशेपार झाली आहे त्याची. टी-ट्वेन्टी सिरीज मधला शेवटचा सामना विशेष महत्वाचा होता… त्याचा शंभरावा सामना. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शंभर आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रॉस टेलर पहिला खेळाडू झाला होता. विशेष क्षण होता तो, पण क्रिकेट मात्र नेहेमीच्याच लयीत, गडबडीत होतं. फार काही लक्षात आलं नव्हतं कुणाला.
परवा मात्र जाणवलं… एकदमच लक्षात आलं क्रिकेट विश्वाच्या. त्याची तपश्चर्या एकदमच झळाळून उठली. ती “वस्तू” एकदमच समोर यावी तसं झालं. अचानकच जाणवलं ही “वस्तू” किती वर्षे साथ देत आहे ते. आपण किती दुर्लक्ष केलं आहे तिच्याकडे हे सुद्धा जाणवलं. तेरा वर्षांची सवय… अशीच कमी कशी होईल?
गोष्ट एका क्रिकेटरची लेखमालेतील वाचनीय लेख-
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
–गोष्ट एका क्रिकेटची भाग १८: एकेकाळचा बाॅम्बे डक ते भारताचा प्रमुख गोलंदाज अजित अगरकर
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १७: धोनी आधी पदार्पण करुनही १४ वर्षांचा वनवास पाहिलेला दिनेश कार्तिक
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १६: राजेशाही घराण्यातूनच क्रिकेटचा वारसा घेऊन आलेला अजय जडेजा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज अनिल कुंबळे
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १२: कारखान्यात काम करायला झाम्बियाला निघालेला मुनाफ पटेल
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ११: लांब केसांमुळे संघात प्रवेश नाकारलेला मुरली विजय
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग १०: भारताचा भन्नाट क्षेत्ररक्षक मोहम्मद कैफ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ८: मिस्टर आयपीएल सुरेश रैना
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ७: अहमदनगरचा मराठमोळा झहीर खान
– गोष्ट एका क्रिकेटरची भाग ६: व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
–एका क्रिकेटटरची गोष्ट भाग ४: ट्रक ड्राईव्हर बनण्यासाठी कॅनडाला निघालेला हरभजन सिंग
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग ३: त्रिशतकाची भविष्यवाणी पदार्पणाआधीच करणारा विरेंद्र सेहवाग!
–गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण