भारत विरुद्ध इंग्लंडच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरुवात झाली. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंड संघ मजबूत स्थितीत दिसून आला. पाहुण्या संघाचा कर्णधार जो रूटच्या नाबाद शतकामुळे पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने ३ बाद २६३ धावा केल्या. यादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीने खिलाडूवृत्ती दाखवून रूटला केलेल्या मदतीमुळे आयसीसीसह अनेकांनी त्याचे कौतुक केले. अशात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने अतिशय मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
त्याचे झाले असे की, इंग्लंडचा कर्णधार रुट शतक झळकावल्यावर देखील अतिशय आत्मविश्वासाने खेळत होता. अशात ८७व्या षटकाला आर अश्विन गोलंदाजी करत असताना रूटने शेवटच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचला. मात्र त्यानंतर नॉन-स्ट्रायकर एंडकडे येत असताना त्याला पायात वेदना झाली आणि तो जमिनीवर पडला. त्यावेळी सामना थांबवण्यात आला आणि इंग्लंडचे फिजिओ मैदानात आले. मात्र फिजिओ येण्याआधी विराटच रूटच्या मदतीला धावून गेल्याचे दिसले. विराटने रूटचे पाय स्ट्रेच करत त्याची वेदना कमी करण्यासाठी मदत केली.
भारतीय कर्णधाराने दाखवलेली ही खिलाडूवृत्ती पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी विराट आणि रूटचा फोटो टाकत कॅप्शनमद्ये लिहिले की, ‘जेव्हा इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या पायात क्रॅम्प आले, तेव्हा सर्वांच्या आधी विराट कोहली त्याच्या मदतीसाठी धावला. मन जिंकणारी खिलाडूवृत्ती.’
आयसीसीच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत ब्रॉडने लिहिले की, ‘मी पण त्यावेळी रुटला पाणी देण्यासाठी धावलो होतो, मग मला खिलाडूवृत्तीसाठी पुरस्कार मिळणार नाही का?’. ब्रॉडच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर चांगलाच हशा पिकला आहे. महत्त्वाचे म्हणजे, वेगवान गोलंदाज असलेल्या ब्रॉडला पहिल्या कसोटी सामन्यातील अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळालेली नाही.
विराटकडून खिलाडू वृत्तीचा उत्तम दाखला- रूट
विराटच्या खिलाडूवृत्तीचे चोहोबाजूंनी कौतुक होत असताना स्वत रूटनेही त्याची प्रशंसा केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना रूट म्हणाला की, “माझ्या पायात थोडा क्रॅम्प आला होता. त्यामुळे मला वेदना होत होत्या. यावेळी लगेचच विराट माझ्याजवळ आला आणि त्याने माझी मदत केली. तो खूप दयाळू आहे. त्याने खूपच चांगली खिलाडूवृत्ती दाखवली. आपण सर्वजण त्याच्याकडून याच गोष्टीची अपेक्षा करतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीच्या खिलाडूवृत्तीने जिंकल जो रूटचही मन; म्हणाला ‘तो खूप दयाळू आहे, त्याने…’