इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने ऍशेस 2023 मालिकेतील पाचव्या कसोटीच्या रूपात सोमवारी (दि. 31 जुलै) आपला अखेरचा सामना खेळला. ब्रॉडने त्याआधी 29 जुलै रोजीच निवृत्तीची घोषणा केली होती. आपल्या सतरा वर्षाच्या कारकिर्दीत शानदार कामगिरी केल्यानंतर त्याने आता समालोचक म्हणून सेकंड इनिंग सुरू केली आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या द हंड्रेड लीगमध्ये तो समालोचन करताना दिसला. यावेळी त्याने आपल्या आवडत्या गोलंदाजाचे नाव सांगितले.
द हंड्रेड लीगमध्ये समालोचन करत असताना त्याने आपल्या आवडत्या गोलंदाजाचे नाव सांगितले. तो म्हणाला,
“सध्या जगातील गोलंदाजांचा विचार केल्यास मला पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी फार आवडतो. तो ज्या प्रकारे रन अप घेतो ते पाहून कमाल वाटते. मला खूप आधीपासून अत्यंत ऊर्जेने रनअप घेणारे गोलंदाज आवडतात. त्याच्याकडे अनेक नैसर्गिक कौशल्य असून, त्याने भविष्यातही चांगली कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे.”
सध्या 23 वर्षांच्या असलेल्या शाहीनने अल्पावधीत मोठे नाव कमावले आहे. पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर तो सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणून समोर आला. तसेच सलग दोन वर्ष पाकिस्तान सुपर लीग जिंकणारा कर्णधार म्हणून देखील त्याने नवा विक्रम नोंदवला. सध्या शाहीन द हंड्रेड लीगमध्ये वेल्शफायर संघासाठी खेळत असून मँचेस्टर विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या पहिल्या दोन चेंडूंवर दोन बळी मिळवले होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढील काही महिन्यांमध्ये आशिया चषक व भारतात होणारा वनडे विश्वचषक या स्पर्धा त्याच्यापुढे मोठे आव्हान निर्माण करणाऱ्या आहेत. तो कशी गोलंदाजी करतो यावर पाकिस्तान संघाचे यश अवलंबून असेल.
(Stuart Broad Said I Like Shaheen Afridi As Favourite Bowler)