टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये अंतिम फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे. आता त्यांना विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरी गाठली. याआधी न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आता १४ नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
त्यांच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने यावेळेस आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत नवीन विजेता संघ मिळणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांना टी-२० विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करता आलेले नाही. मात्र, न्यूझीलंडसाठी विजेतेपद पटकावणे सोपे दिसत नाही. न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसतो.
न्यूझीलंडचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न पुन्हा भंगणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, कारण २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यांना दुर्दैवाने अंतिम फेरीत हार पत्करावी लागली होती. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे या सामन्यातही त्यांच्यावर दबाव असेल.
दुसरीकडे, आकडेवारी पाहिल्यास ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर अधिक प्रभाव दर्शविला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये उभय संघांमध्ये आत्तापर्यंत १४ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ९ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांत विजय नोंदवण्यात यश आले आहे. त्यामुळे आकडेवारीत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघासाठीही विजय सोपा नसेल. कारण न्यूझीलंडच्या सध्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर न्यूझीलंड संघाने अंतिम सामन्यात प्रवेश करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करून न्यूझीलंड संघ ज्या पद्धतीने जिंकला होता त्यामुळे ऑस्ट्रेलियाचीही झोप उडाली असेल. सलामीवीर डॅरिल मिशेल आणि डेविड कॉनवेसारखे फलंदाज न्यूझीलंडला विजय मिळवून देऊ शकतात. मिशेलने उपांत्य फेरीत ४७ चेंडूत केलेल्या नाबाद ७२ धावा ऑस्ट्रेलिया संघाच्या गोलंदाजांना चिंतेत आणू शकतात. त्याचबरोबर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेले मागील ५ पैकी तीन सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: वॉर्नरची पाकिस्तानविरुद्ध सेमीफायनलमधील ‘ही’ चूक ऑस्ट्रेलियाला पडली असती भलतीच महागात
पुढीलवर्षी विश्वचषकापूर्वी भारतीय संघ करणार न्यूझीलंड दौरा, असे आहे वेळापत्रक
मॅथ्यू वेड म्हणतोय, ‘हसन अलीने जरी झेल घेतला असता, तरी आम्ही जिंकलोच असतो’