येत्या १३ जानेवारी पासून १९ वर्षांखालील विश्वचषकाला सुरुवात होत आहे. यावर्षी या विश्वचषकाचे नेतृत्व मुंबईकर फलंदाज पृथ्वी शॉकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चौथ्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणार का याची उत्सुकता सर्वांना आहे.
याआधी १९ वर्षांखालील भारतीय संघाने २०००, २००८ आणि २०१२ या तीन वर्षी हा विश्वचषक जिंकला आहे. तसेच २०१६ मध्ये झालेल्या विश्वचषकात भारतीय संघ उपविजेता झाला होता.
भारताने जिंकलेले तीनही विश्वचषक वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली जिंकले आहेत. या तीन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकला आहे १९ वर्षांखालील विश्वचषक:
मोहम्मद कैफ: २००० साली झालेल्या विश्वचषकात कर्णधारपदाची धुरा मोहम्मद कैफवर सोपवण्यात आली होती. या संघात त्यावेळी युवराज सिंग, वेणुगोपाल राव यांसारखे खेळाडू होते. ज्यांनी नंतर वरिष्ठ भारतीय संघात खेळताना उत्तम कारकीर्द घडवली.
या स्पर्धेत भारतीय संघाचा अंतिम सामना श्रीलंका संघाविरुद्ध झाला होता. या सामन्यात भारताने ६ विकेट्स आणि ५६ चेंडू राखून विजय मिळवला होता आणि पहिल्यांदाच १९ वर्षांखालील विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. कर्णधार असणाऱ्या कैफनेही या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली होती.
विराट कोहली: सध्याच्या वरिष्ठ भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या विराट कोहलीने २००८ साली १९ वर्षांखालील भारतीय संघाचेही नेतृत्व केले होते. या विश्वचषकातच त्याच्यात असणारे नेतृत्व गुण दिसले होते.
त्याने या स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याच्यासाठी वरिष्ठ भारतीय संघाचीही दारे खुली करण्यात आली होती. २००८ मध्ये विराटच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर डकवर्थ लुईस नियमानुसार १२ धावांनी विजय मिळवला होता.
या विश्वचषकासाठी रवींद्र जडेजाकडे उपकर्णधारपद होते. कोहली आणि जडेजा या दोघांनीही या नंतर वरिष्ठ भारतीय संघात स्थान मिळवले.
उन्मुक्त चंद: विराट कोहली नंतर ज्याच्या कडे पाहिलं जात होत त्या उन्मुक्त चंदने कर्णधार म्हणून २०१२ चा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला खरा पण त्यानंतर त्याला विशेष असं काही करता न आले नाही.
त्याने २०१२ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नाबाद १११ धावांची खेळी केली होती. ज्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया संघावर ६ विकेट्सने विजय मिळवला होता.
https://www.instagram.com/p/BdzroeZHSY2/?hl=en&taken-by=maha_sports
या तीन विश्वचषकांमध्ये खेळलेले अनेक खेळाडूंसाठी विश्वचषकानंतर वरिष्ठ भारतीय संघाची दारे खुली झाली होती. त्यामुळे या वर्षी पृथ्वी शॉकडूनही चांगल्या कामगिरीची सर्वांची अपेक्षा असेल. त्याने या मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना स्वतःची क्षमता सिद्ध केली होती. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९ सामन्यात ५ शतके आणि ३ अर्धशतकांसह ९६१ धावा केल्या आहेत.