क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात कर्णधाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण, तो कर्णधारच असतो, जो मैदानावर महत्त्वाचे निर्णय घेतो आणि कोणत्याही परिस्थितीत पुढाकार घेऊन संघाचे नेतृत्त्व करतो. एका कर्णधाराला शानदार रणनिती आखण्याव्यतिरिक्त चांगले प्रदर्शनही करावे लागते. कारण, जर कोणता कर्णधार स्वत:च चांगले प्रदर्शन करत नसेल, तर तो त्याच्या संघातील इतर खेळाडूंना कसा प्रोत्साहित करेल?
क्रिकेट इतिहासात आतापर्यंत अनेक असे दिग्गज फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी स्वत: जबरदस्त प्रदर्शन केले आहे. रिकी पाँटींग, एमएस धोनी, ग्रॅमी स्मिथ, स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रायन लारा यांचा यामध्ये समावेश होतो. या लेखात, आम्ही तुम्हाला त्या टॉप-३ कर्णधारांविषयी सांगणार आहोत, ज्यांनी एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. या यादीत एका सक्रिय कर्णधाराचेही नाव आहे.
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे टॉप-३ कर्णधार (Top-3 Captains With Most Runs In One ODI Series)
३. केन विलियम्सन –
कर्णधार असताना एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत केन विलियम्सनचा तिसरा क्रमांक लागतो. न्यूझीलंडच्या विलियम्सनने २०१९ सालच्या विश्वचषकात हा कारनामा केला होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. यामध्ये विलियम्सनचा मोलाचा वाटा होता. कारण, त्याने विश्वचषकात १० सामन्यांतील ९ डावात फलंदाजी करत ५७८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या २ शतकांचा आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. तर, त्याच्या वैयक्तिक सर्वोच्च धावा या १४८ इतक्या होत्या. त्या विश्वचषकात मालिकावीर पुरस्कारही त्याला मिळाला होता.
२. ऍलन बॉर्डर –
या यादीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज कर्णधार ऍलन बॉर्डर याचा दूसरा क्रमांक लागतो. बॉर्डर यांनी १९८४-८५ सालच्या बेंसन अँड हेजेस विश्व मालिकेत (वर्ल्ड सिरीज) सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यांनी या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून १३ सामन्यातील १२ डावांत ३ वेळा नाबाद राहत ५९० धावा केल्या होत्या. यात त्याच्या २ शतकांचा आणि ४ अर्धशतकांचा समावेश होता. तसेच, त्यांची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद १२७ धावा इतकी होती.
१. ग्रेग चॅपेल –
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत ग्रेग चॅपेल हे अव्वल क्रमांकावर विराजमान आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या माजी कर्णधाराने १९८०-८१ सालच्या बेंसन अँड हेजेस विश्वमालिकेत हा पराक्रम केला होता. त्यावेळी १४ सामने खेळत चॅपेलने ६८.६०च्या सरासरीने ६८६ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या एका शतकाचा आणि ५ अर्धशतकांचा समावेश होता. तर, त्यांच्या वैयक्तिक सर्वाधिक धावा या नाबाद १३८ इतक्या होत्या.
ट्रेंडिंग लेख –
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये सुपर डुपर फ्लॉप ठरलेले क्रिकेटर या वेळी होऊ शकतात हिरो
या पाच दिग्गजांची मुले पुढे खेळू शकतात राष्ट्रीय संघासाठी
अशा ६ घटना जेव्हा नाईटवॉचमन म्हणून खेळायला आलेल्या क्रिकेटपटूने केले शतक
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीआयने बदलले देशांतर्गत क्रिकेटचे नियम, आता कोचिंग करण्यासाठी आहे या वयाची अट
तब्बल १९ हजार धावा करणारा क्रिकेटर झाला इंग्लंडचा फलंदाजी कोच, पाकिस्तान मालिकेत करणार महागुरुचे काम
माजी क्रिकेटर राहुल द्रविड पुन्हा आला टीम इंडियाच्या मदतीला, आता सांभाळणार ही जबाबदारी