प्रो कबड्डी लीगमध्ये शनिवारी (१५ जानेवारी) ‘ट्रिपल पंगा’ झाला. या एकाच दिवशी तीन सामने खेळले गेले. यामध्ये पहिल्या सामन्यात दबंग दिल्लीने हरियाणा स्टीलर्सवर मात करत दोन पराभवानंतर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात परदीप नरवालच्या शानदार खेळाच्या जोरावर यूपी युद्धाने तेलगू टायटन्सला पराभूत केले. तर तिसर्या व रोमांचक सामन्यात बंगाल वॉरियर्सने यु मुंबासह टाय खेळला.
दिवसातील पहिल्या सामन्यात दोन पराभव स्वीकारलेला दबंग दिल्ली विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला. नवीन कुमार सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरला तरी, अनुभवी डिफेंडरच्या मदतीने दिल्लीने हरियाणावर २८-२५ अशी मात केली.
दिवसातील दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या तेलगू टायटन्सचा सामना हळूहळू लय पकड असलेल्या युपी योद्धाशी झाला. सामन्यातील जवळपास ३५ मिनिटे दोन्ही संघ बरोबरीत होते. मात्र, संधी मिळताच यूपी संघाने कुरघोडी करत आघाडी घेतली. शेवटच्या दोन मिनिटात एकट्या परदीपने तीन वेळा संघाचा ऑल आउट टाळला व युपीला ३९-३३ असा विजय मिळवून दिला.
बंगाल वॉरियर्स विरुद्ध यु मुंबा या दिवसातील तिसऱ्या सामन्यात पहिल्या दोन सामन्यांत पेक्षा अधिक संघर्ष पहायला मिळाला. बंगाल साठी कर्णधार मनिंदर हा एकाकी लढताना दिसला. पहिल्या हाफमध्ये बंगाल १९-१७ अशा आघाडीवर होता. त्यापैकी ११ गुण एकट्या मनिंदरने मिळवले होते. दुसऱ्या हाफमध्येही परिस्थिती फारशी बदलली नाही. आपल्या सहकाऱ्यांकडून अपेक्षित साथ मिळत नसली तरी मनिंदरने संघाची आघाडी टिकवून ठेवली. अखेरीच्या दोन मिनिटात मुंबईने शानदार कमबॅक करत सामना ३२-३२ असा टाय केला.