वाढदिवस विशेष: एबीची क्रेझ एवढी की पठ्ठ्याने बैलाच्या पाठीवर काढली एबीची नक्षी

आज(17 फेब्रुवारी) दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सचा ३६ वा वाढदिवस आहे. डिविलियर्स आत्तापर्यंत क्रिकेटमध्ये अनेक मोठे पराक्रम केले आहेत. त्याच्या फलंदाजी करताना मैदानाच्या सर्व दिशांमध्ये फटके मारण्याच्या शैलीमुळे त्याला मिस्टर ३६० असे नावही पडले. डिविलियर्सची लोकप्रियता भारतातही मोठ्या प्रमाणात आहे. याची प्रचीती अनेकदा भारतीय चाहते त्याच्यावरील प्रेमासाठी करत असलेल्या विविध कृतींमधून येते.

नुकताच मागील महिन्यात 15 तारखेला दक्षिण भारतात पोंगल सण उत्साहात साजरा करण्यात आला.4 दिवस चालणाऱ्या या सणात तिसऱ्य़ा दिवशी बैल तसेच गायीचे पुजन केले जाते. तसेच बैलांच्या पाठीवर विविध रंगाच्या डिजाईनही काढल्या जातात.

याच सणाचे औचित्य साधून कर्नाटकमधील एका चाहत्याने आपल्या लाडक्या बैलाच्या पाठीवर चक्क एबी डिविलियर्सच्या नावाची नक्षी काढली होती. तसेच त्यावर आपल्या आवडत्या राॅयल चॅलेंजर बेंगलोर(आरसीबी) संघाचा लोगो आणि नाव लिहीले आहे.

हा फोटो ट्विटरवर अनेक चाहत्यांनी शेअर केला असून याला जोरदार रिट्विट मिळत आहेत. तसेच आरसीबीच्या फॅन अकाऊंट ‘नम्मा आरसीबी फॅन’वरुनही बैलाच्या पाठीवर डिविलियर्सच्या नावाची नक्षी काढलेला फोटो शेअर करण्यात आला आहे.

एबी डिविलियर्स हा आयपीएलमधील आरसीबी संघाकडून खेळतो. तसेच त्याला भारतात भारतीय खेळाडूंप्रमाणेच मोठा चाहता वर्ग आहे. भारतात सर्वाधिक प्रेम मिळालेला परदेशी खेळाडू असेही त्याला म्हटले जाते. त्यामुळे कर्नाटकमध्ये एबीचा मोठा चाहता वर्ग आहे यात नक्कीच काही नवल नाही.

एबीने आयपीएलमध्ये 154 सामन्यात 39.95च्या सरासरीने 4395 धावा केल्या आहेत. 2018मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलेला हा खेळाडू सध्या विविध देशांतील टी20 लीगमध्ये मात्र जबरदस्त कामगिरी करतोय.

You might also like