विराट कोहलीने 2024 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता तो फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसतो. गेल्या काही वर्षांत वनडे सामने खूप कमी झाले आहेत, त्यामुळे त्याला टीम इंडियाची ब्लू जर्सी घालण्याची संधीही कमी मिळाली आहे. आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना या 37 वर्षीय सुपरस्टारने आपल्या व्हॅल्यूबाबत सतत बदलणाऱ्या मतांवर नाराजी व्यक्त केली.
विराट कोहलीने 2025-26 हंगामात तब्बल दोन दशकांनंतर विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याचं उदाहरण दिलं. त्याने दिल्लीकडून दोन सामने खेळले आणि त्यापैकी एका सामन्यात शतक झळकावत लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 16 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू बनला.
विराट म्हणाला,“मी तिथे अगदी स्पष्ट विचार घेऊन गेलो होतो की मला कोणालाही काही सिद्ध करायचं नाही. मी तिथे खेळायला गेलो कारण मला क्रिकेट खेळायला आवडतं. मला खेळावर प्रेम आहे म्हणून मी खेळतो. पुन्हा फलंदाजी करताना मला एका लहान मुलासारखं वाटत होतं. हे कोणासाठी नव्हतं, फक्त माझं आणि क्रिकेटचं नातं होतं.”
विराटने 2027 वर्ल्ड कपबाबतही विराटने स्पष्ट भूमिका मांडली. तो म्हणाला, “जर मी क्रिकेट खेळत असेन, तर मला खेळत राहायचं आहे. भारतासाठी वर्ल्ड कप खेळणं ही मोठी गोष्ट आहे. माझा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. मी ज्या वातावरणाचा भाग आहे, तिथे मी काही योगदान देऊ शकतो आणि संघालाही तसं वाटत असेल तर मी खेळत राहीन. पण जर मला माझी काबिलियत आणि महत्त्व सिद्ध करण्याची वेळ आली, तर मी त्या वातावरणात राहू शकत नाही.”
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीची आकडेवारीही जबरदस्त आहे. 311 सामन्यांत त्याने 58.71 च्या सरासरीने 14,797 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 54 शतकं आणि 77 अर्धशतकं आहेत. दबावाच्या परिस्थितीत लक्ष्याचा पाठलाग करताना उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्याला ‘चेस मास्टर’ हे टोपणनाव मिळालं आहे.






