ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यादरम्यान १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला (बॉर्डर-गावसकर ट्रॉफी) सुरुवात होणार आहे. मालिका सुरू होण्यास आणखी एक आठवडा शिल्लक असताना अनेक दिग्गज या मालिकेविषयी आपापली मते व्यक्त करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संभावित ११ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. मालिकेतील पहिला कसोटी सामना ऍडलेड येथे खेळवला जाईल. हा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा असेल.
मालिका होईल चुरशीची
ऑस्ट्रेलियाकडून ७०६ कसोटी बळी मिळवणाऱ्या वॉर्नने एका क्रीडा वाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत, पहिल्या कसोटीविषयी बोलताना वॉर्न म्हणाला, “आगामी मालिका अत्यंत चुरशीची होणार आहे. पहिल्या मालिकेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उपलब्ध नसेल, तर भारताचा कर्णधार विराट कोहली देखील संपूर्ण मालिका खेळणार नाही. त्यामुळे, मालिकेतील रंगत कायम राहील.”
अशी असावी ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन
वॉर्नने पहिल्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग इलेव्हनविषयी आपले मत देताना म्हटले, “वॉर्नर पहिल्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे, त्याच्या जागी जो बर्न्ससह मार्कस हॅरिस सलामीवीर असावा. सराव सामन्यात दुखापतग्रस्त झालेला विल पुकोव्हस्की तंदुरुस्त झाला, तर बर्न्ससोबत त्याने सलामीला यावे. तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे सर्वोत्तम फलंदाज असलेले स्टीव स्मिथ व मार्नस लॅब्यूशाने खेळतील. पाचव्या क्रमांकावर कर्णधार टीम पेनने खेळावे. सहाव्या क्रमांकावर मॅथ्यू वेड अथवा अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन खेळू शकतात.”
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाविषयी बोलताना वॉर्न म्हणाला, “ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी आक्रमण मला अत्यंत प्रभावी वाटते. मिचेल स्टार्क, जॉस हेजलवूड व उपकर्णधार पॅट कमिन्स हे तीनही अनुभवी वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचे ठरतील. ट्रेविस हेड व नॅथन लायन फिरकीची बाजू सांभाळतील. हेड अष्टपैलू म्हणूनही छाप पाडू शकतो.”
कसोटी मालिका सुरू होण्याआधी ऑस्ट्रेलिया अ आणि भारतीय अ संघादरम्यान शुक्रवारपासून (११ डिसेंबर) तीनदिवसीय सराव सामना खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात