कोणत्याही क्रिकेट संघात एका स्थानासाठी स्पर्धा होणे साहजिक असते. परंतु या स्पर्धेमुळे एका खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत सतत तडजोड करावी लागते. असेच काहीसे भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्यासोबत झाले आहे. सुरुवातीच्या काळात त्याला भारताचा माजी यष्टीरक्षक एमएस धोनीमुळे संघाबाहेर राहावे लागले होते. तर आता यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतमुळे संघात निवड होऊनही त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. आता साहाने आपल्या क्रिकेट प्रवासावर प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक असलेल्या धोनीने २०१४ साली कसोटी स्वरुपातून निवृत्ती घेतली होती. त्याच्या निवृत्तीनंतर साहाला नियमित रुपात कसोटी संघात जागा मिळाली होती. परंतु पंतच्या प्रवेशानंतर पुन्हा त्याचे आत-बाहेर होण्याचे सत्र सुरू झाले आहे.
क्रिकेट्रॅकरशी याबद्दल बोलताना साहा म्हणाला की, “माही भाईने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मला सातत्याने संघात संधी मिळू लागल्या होत्या. माही भाई संघात असताना सर्वांना माहिती होते की, तो प्रत्येक सामन्यात खेळणारच आहे. तरीही मी संधी मिळाल्यास तिला दोन्ही हातांनी घट्ट पकडण्यास तयार असायचो. माझ्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावेळी असेच झाले होते. मला सुरुवातीला सांगितले गेले होते की, मी खेळणार नाही. पण नंतर अचानक मला बोलावणे आले होते. त्यानंतर मला संधी मिळणार नाही हे माहित असूनही मी पुढील प्रत्येक सामन्यात खेळण्याच्या दृष्टीने तयारी केली होती.”
“माही भाई संघात असताना त्याला कधी दुखापत झाल्यास मला त्याच्याजागी खेळवले जायचे. तो २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पुढे २०१८ पर्यंत माझे संघातील स्थान पक्के झाले होते. यावेळी मी बरीचशी अर्धशतके आणि शतके केली होती. माझी आकडेवारीही चांगली राहिली होती. परंतु जर तुम्हाला २ वर्षांतून एक सामना खेळायला मिळत असेल; तर या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात. खेळाडूची निवड संघ व्यवस्थापनाच्या हाती असते,” असे त्याने पुढे सांगितले.
वृद्धिमान साहाला भारतीय संघाची मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी संघात निवड केली होती. परंतु फक्त एका सामन्यात तो अंतिम एकादशमध्ये खेळला होता. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला असतानाही तो कसोटी संघाचा भाग होता. परंतु पूर्ण कसोटी मालिकेदरम्यान त्याला बाकावर बसून राहावे लागले होते.
भारतीय संघाला १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी त्याची २० सदस्यीय भारतीय संघात निवड झाली आहे. परंतु तो प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसेल की नाही, हे सांगणे कठीण आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आळशीपणाचा कळस! ‘अशी’ असेल क्रिकेटविश्वातील सर्वात आळशी खेळाडूंची प्लेईंग इलेव्हन
‘उनाडकटचे पुनरागमन दूरच, त्याला शेवटच्या ३० खेळाडूंमध्ये जागा मिळणार नाही,’ माजी प्रशिक्षकाचा दावा
‘आयपीएल २०२२मध्ये धोनी स्वत:च सीएसकेला म्हणेल, मला जाऊ द्या!’