2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका दिवसात 3 कुस्तीपटूंचा पराभव करून अंतिम फेरी गाठणारी भारताची विनेश फोगट अपात्र ठरली आहे. विनेश आज महिलांच्या 50 किलो वजनी गटात फायनलमध्ये खेळणार होती, मात्र त्याआधीच तिला जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आलं. आता उपांत्य फेरीत विनेशकडून पराभूत झालेली कुस्तीपटू तिच्या जागी अंतिम सामना खेळणार आहे.
विनेश फोगटनं 50 किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीत विश्वविजेत्या सुसाकीला पराभूत करून मोठा अपसेट केला होता. यानंतर तिनं युक्रेनच्या ओक्सानाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मंगळवारी रात्री विनेशनं उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, आता तिला अंतिम सामना खेळता येणार नाही.
आता विनेश फोगटच्या जागी क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन अंतिम फेरीत खेळणार असल्याची पुष्टी आयओसीनं केली आहे. म्हणजेच उपांत्य फेरीत विनेशकडून पराभूत झालेली पैलवान आता अंतिम फेरीत खेळणार आहे. फायनलमध्ये युस्नेलिस गुझमनचा सामना अमेरिकेच्या सारा ॲन हिल्डब्रँडशी होईल. हा अंतिम सामना आज रात्री 12.30 वाजता खेळला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनेश फोगटला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा भारतानं तीव्र विरोध केला आहे. विनेश फोगटचं वजन अवघं 100 ग्रॅम जास्त भरल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं. विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर तिच्या कुटुंबीयांनी सरकार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामागे सरकार आणि ब्रिजभूषण सिंह यांचा हात असल्याचं कुटुंबीय म्हणाले आहेत.
नियमानुसार, अपात्र ठरल्यानंतर आता विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोणतेही पदक मिळणार नाही. याचाच अर्थ अंतिम फेरीत पोहोचूनही विनेशला पदकाविना मायदेशी परतावं लागेल. अपात्रतेची बातमी ऐकल्यानंतर विनेश फोगट बेशुद्ध झाल्याची बातमी समोर आली होती, ज्यानंतर तिला ऑलिम्पिक व्हिलेजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, विनेशला डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
हेही वाचा –
विनेश फोगटला अपात्र ठरवणारा कुस्तीचा नियम काय आहे? पैलवानाचं वजन कसं केलं जातं? जाणून घ्या
काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलंच
“विनेशविरुद्ध कट रचला, यामागे सरकारचा हात”; कुटुंबीयांचा गंभीर आरोप