क्रिकेटची सुरूवात ज्यावेळी झाली होती, तेव्हा क्रिकेटचा केवळ एकच प्रकार खेळला जात होता. तो क्रिकेट प्रकार म्हणजेच कसोटी क्रिकेट होय. कसोटी क्रिकेटच्या सुरूवातीला एक कसोटी सामना ६ दिवस खेळला जात होता. परंतु नंतर तो ५ दिवस करण्यात आला.
एक कसोटी सामना तब्बल ५ दिवस खेळला जात असल्यामुळे सध्याच्या काळात कसोटी क्रिकेट प्रकारात खेळणे अधिकतर फलंदाजांना आवडत नाही.
आपली फीटनेस लक्षात घेता, अनेक युवा खेळाडू आजच्या काळात खूप कमी वयात कसोटी क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेताना दिसत आहेत.
आपल्या सर्वांनाच माहीत असेल, की एका कसोटी सामन्यात दोन्हीही संघ प्रत्येकी २वेळा फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. परंतु कसोटी क्रिकेट इतिहासात असेही काही फलंदाज होऊन गेले आणि आहेत, ज्यांनी एका कसोटी सामन्यादरम्यान ५ दिवस फलंदाजी केली आहे. ५ दिवस फलंदाजी म्हणजे ते पुर्ण दिवसात एकदातरी मैदानावर फलंदाजीसाठी आले आहेत.
आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. दुसऱ्या संघालाही फलंदाजी येते मग एक फलंदाज ५ दिवस कशी फलंदाजी करले. तर सोप्पं आहे. समजा ‘अ’ हा खेळाडू पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी सकाळी खेळला. प्रतिस्पर्धी संघ दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी खेळला व ‘अ’ या खेळाडूला पुन्हा तिसऱ्या दिवशीचे शेवटचे सत्र, चौथा पुर्ण दिवस व पाचव्या दिवशी सकाळी काही चेंडू खेळायला मिळू शकता. अशी या ५ दिवसात अनेक समिकरण होतात. त्यामुळे तब्बल १० खेळाडूंनी एका कसोटी सामन्यात ५ दिवसातील प्रत्येक दिवशी एकतरी चेंडू खेळला आहे.
तरीही एक उदाहरण पाहुच-
१६ ते २० नोव्हेंबर २०१७ दरम्यान भारत व श्रीलंका यांच्यात कोलकाता कसोटी सामना झाला होता. यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद १७४ धावा केल्या होत्या. दिवसाखेर पुजारा ८ धावांवर खेळत होता. तर भारताच्या धावा २ बाद १७ अशा होत्या. बॅड लाईटमुळे सामना थांबविण्यात आला होता.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. दुसऱ्या दिवशी दिवसाखेर पुजाराने नाबाद २९ धावा केल्या होत्या. तर भारताने ५ बाद ५० धावा केल्या होत्या. या दिवशीही पावसामुळे बराच वेळ खेळ झाला नव्हता. तिसऱ्या दिवशी पुजाराने ११७ चेंडूत ५२ धावा केल्या. परंतु तो बाद झाला. तसेच भारताचा डाव १७४ धावांवर संपुष्टात आला.
त्यानंतर तिसऱ्या दिवसाखेर श्रीलंकेने ४ बाद १६४ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी श्रीलंकेचा २९४ धावांवर संपला. यानंतर चौथ्या दिवशी भारतीय संघ पुन्हा फलंदाजीला आला. यात भारताने १ बाद १७१ धावा केल्या होत्या. तर पुजारा नाबाद २ धावांवर खेळत होता. त्यानंतर पाचव्या दिवशी ५१ चेंडूत २२ धावा केल्या व तो बाद झाला. भारताने ८ बाद ३५२ धावा केल्या व आपला डाव घोषीत केला. अशा प्रकारे पुजाराने पाचही दिवस फलंदाजी केली. त्यानंतर पाचव्या दिवशी श्रीलंकेने ७ बाद ५७ धावा केल्या परंतु दिवस संपल्याने सामन्याचा निकाल लागला नाही.
आज या लेखात आपण त्या १० फलंदाजांंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी असा कारनामा करून दाखवलाय.
कसोटी सामन्याच्या ५ दिवस फलंदाजी करणारे १० फलंदाज- 10 Batsmen batted for 5 days in Test Cricket
१. एम. एल. जयसिम्हा (भारत- १९६०)
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ५ दिवस फलंदाजी करण्याचा पहिला विक्रम भारताच्या एम. एल. जयसिम्हा (M L Jaisimha) यांच्या नावावर आहे. त्यांनी १९६०मध्ये कोलकाता येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना हा कारनामा केला होता. त्या सामन्यात भारताकडून खेळताना जयसिम्हा यांनी पहिल्या डावात २० आणि दुसऱ्या डावात ७४ धावा केल्या होत्या. तो सामना अनिर्णत राहिला होता.
विशेष म्हणजे १९६० च्या दशकातही एक कसोटी सामना ५ दिवस खेळला जात होता. कारण ३ दिवस खेळल्यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी खेळाडूंना विश्रांतीसाठी तो दिवस दिला जात होता
२. जेफ बॉयकॉट (इंग्लंड- १९७७)
जेफ बॉयकॉट (Geoff Boycott) हे इंग्लंडचे पहिले आणि जगातील दुसरे फलंदाज होते, ज्यांनी कसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी केली होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये १९७७ साली खेळण्यात आलेल्या त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नॉटिंघममध्ये खेळण्यात आलेल्या त्या सामन्यात बॉयकॉट यांनी पहिल्या डावात १०७ धावा आणि दुसऱ्या डावात नाबाद ८० धावा केल्या होत्या.
तो सामना इंग्लंडने ७ विकेट्सने जिंकला होता.
३. किम ह्यूज (ऑस्ट्रेलिया- १९८०)
किम ह्यूज (Kim Hughes) हे ऑस्ट्रेलियाचे एकमेव फलंदाज आहेत, ज्यांनी कसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी केली आहे. त्यांनी हा कारनामा १९८० मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळताना केला होता. त्यात त्यांनी पहिल्या डावात १०७ आणि दुसऱ्या डावात ८४ धावांची खेळी केली होती.
तो सामना अनिर्णित राहिला होता.
४. ऍलन लॅम्ब (इंग्लंड- १९८४)
इंग्लंड संघाचे मधल्या फळीतील फलंदाज ऍलन लॅम्ब (Allan Lamb) यांनी १९८४मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध एका कसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी करण्याचा कारनामा केला होता. त्यांनी सामन्याच्या पहिल्या डावात २३ आणि दुसऱ्या डावात ११० धावा केल्या होत्या. त्या सामन्यात विंडीज संघाने इंग्लंडवर ९ विकेट्सने विजय मिळविला होता.
५. रवी शास्त्री (भारत- १९८४)
भारताकडून रवी शास्त्रींनी (Ravi Shastri) १९८४ साली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी करण्याचा विक्रम केला होता. भारताकडून असा कारनामा करणारे ते दुसरेच भारतीय फलंदाज बनले होते. ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये खेळण्यात आला होता. त्या सामन्यात शास्त्रींनी पहिल्या डावात १११ धावांची तर दुसऱ्या डावात नाबाद ७ धावांची खेळी केली होती.
६. एड्रियन ग्रिफिथ (वेस्ट इंडीज- १९९९)
वेस्ट इंडीजसाठी केवळ १४ कसोटी सामने खेळणारे माजी खेळाडू एड्रियन ग्रिफिथ (Adrian Griffith) यांनी १९९९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध असा कारनामा केला होता. त्यांनी पहिल्या डावात ११८ आणि दुसऱ्या डावात १८ धावा केल्या होत्या. कसोटी सामन्याच्या पाचही दिवस फलंदाजी करणारे एड्रियन विंडीज संघाचे एकमेव खेळाडू आहेत.
तो सामना न्यूझीलंडने ९ विकेट्सने जिंकला होता.
७. अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड- २००६)
इंग्लंड संघाचे माजी कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफ (Andrew Flintoff) हे इंग्लंडचे तिसरे खेळाडू होते, ज्यांनी २००६मध्ये मोहाली येथे भारताविरुद्ध खेळताना एका कसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी करण्याचा कारनामा केला होता. त्यांनी कसोटीच्या पहिल्या डावात ७० आणि दुसऱ्या डावात ५१ धावा केल्या होत्या. तसेच त्यांनी त्या सामन्यात ४ विकेट्सही चटकावले होते. परंतु भारताने त्या सामन्यात इंग्लंडवर ९ विकेट्सने विजय मिळविला होता.
८. एल्विरो पीटरसन (दक्षिण आफ्रिका- २०१२)
दक्षिण आफ्रिका संघाचे फलंदाज एल्विरो पीटरसन (Alviro Petersen) यांनी २०१२मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच देशात हा कारनामा केला होता. पीटरसन यांनी पाच दिवस फलंदाजी करताना एकूण १९५ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्यांनी पहिल्या डावात १५६ आणि दुसऱ्या डावात ३९ धावा आपल्या नावावर केल्या होत्या. कसोटी सामन्यात पाच दिवस फलंदाजी करणारे पीटरसन हे दक्षिण आफ्रिकेचे एकमेव फलंंदाज होते.
९. चेतेश्वर पुजारा (भारत- २०१७)
भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) तिसरा असा फलंदाज होता, ज्याने कसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी केली होती. पुजाराने हा कारनामा २०१७ साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना केला होता. त्या सामन्यात पुजाराने पहिल्या डावात ५२ आणि दुसऱ्या डावात २२ धावा केल्या होत्या. शेवटी हा सामना अनिर्णित राहिला होता.
१०. रोरी बर्न्स (इंग्लंड- २०१९)
इंग्लंड संघाचा डावखुरा सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्सने (Rory Burns) २०१९मध्ये ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच कसोटी सामन्यात हा कारनामा केला होता. अशाप्रकारे ते कसोटी सामन्यात पाचही दिवस फलंदाजी करणारा इंग्लंडचा चौथा फलंदाज बनला होता. त्या सामन्यात बर्न्सने पहिल्या डावात १३३ आणि दुसऱ्या डावात ११ धावा करण्याचा कारनामा केला होता.
तो सामना ऑस्ट्रेलिया संघाने २५१ धावांनी जिंकला होता.