अशी अनेक कारणे असतात ज्यामुळे क्रिकेट सामना सुरू होण्यास विलंब होऊ शकतो. पाऊस, ओले मैदान, खराब प्रकाश आणि अगदी अती सूर्यप्रकाशानेही सामना उशिरा सुरू झालेली उदाहरणे आहेत. परंतु बेल्स हरवल्यामुळे सामन्याला विलंब झाला असे कधी ऐकले आहेत का ? १९९६ मध्ये श्रीलंकेत झालेल्या सिंगर वर्ल्ड सिरीज स्पर्धेदरम्यान अशी घटना घडली होती.
यजमान श्रीलंकेसह ऑस्ट्रेलिया, भारत व झिम्बाब्वे संघ या स्पर्धेत खेळत होते. श्रीलंकेने भारत व ऑस्ट्रेलियाला मात देऊन अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली होती. दुसरीकडे, झिम्बाब्वेला भारत व ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. साखळी फेरीतील अखेरचे दोन सामने ( श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे व भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ) शिल्लक होते. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील विजेता संघ श्रीलंकेसोबत अंतिम फेरी खेळणार हे निश्चित होते.
मालिकेतील पाचवा सामना श्रीलंका व झिम्बाब्वे यांच्या दरम्यान होता. कोलंबोच्या सिंहलीज स्पोर्ट्स क्लब मैदानावर या सामन्याचे आयोजन केले जात होते. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत झिम्बाब्वेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सामन्याचे पंच म्हणून काम पाहणारे स्टीव बकनर व सिरील मिचले मैदानात उतरण्यापूर्वी स्टम्पवर ठेवल्या जाणाऱ्या बेल्स शोधू लागले. त्यांना बेल्स मिळत नाही हे पाहून, तिसरे पंच सिरील कुरे हेसुद्धा बेल्स शोधायला त्यांची मदत करत होते. सामनाधिकारी जॉन रीड यांनी नियमावली वाचता वाचता बेल्स शोधण्यास सुरुवात केली.
सामना सुरू होण्याची वेळ जवळ आली होती आणि इकडे बेल्स सापडत नव्हत्या. मैदानावर दाखल झालेले खेळाडू, सामना का सुरू होईना म्हणून चिंतेत पडले. प्रेक्षकांना तर या गोष्टीची कल्पनाच नव्हती. काही प्रेक्षकांनी सामना सुरु करायच्या घोषणा द्यायला सुरु केले. शेवटी, बेल्स मिळाल्यानंतर नियोजित वेळेपेक्षा आठ मिनिटे उशिराने सामना सुरू करण्यात आला.
तपासाअंती, हे लक्षात आले की, मैदानावरील एका कर्मचाऱ्याने बेल्स आपल्या खिशात ठेवल्या होत्या. त्याला वाटलेले ऐन वेळेला बेल्स हरवतील, म्हणून ही काळजी त्याने घेतली होती. मात्र, या अतिकाळजीनेच सामन्याला उशीर झाला.
सामना सुरू झाल्यावरही सुरुवात काहीशी मनोरंजक झाली. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज प्रमोद्य विक्रमसिंघे याने पहिल्याच षटकात पाच वाईड चेंडू टाकले. झिम्बाब्वेने ५० षटकात ५ बाद २२७ धावा धावा फलकावर लावल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या क्रेग इवांसने १०५ चेंडूत ९५ धावांची खेळी साकारली. यात ६ चौकार व ३ षटकारांचा समावेश होता.
आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामीवीर २५ धावांत तंबूत परतले. अरविंद डिसिल्वाने १४ चौकारांच्या मदतीने १२३ चेंडूत १२७ धावांची शतकी खेळी केली. डिसिल्वाच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने झिम्बाब्वेचा सहा गडी राखून पराभव केला.
अखेरच्या साखळी सामन्यात, ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत यजमान श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला ५० धावांनी पराभूत करत, सिंगर वर्ल्ड सीरिज स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.
ट्रेंडिंग लेख –
असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे
आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा
आयपीएलमध्ये ‘या’ ५ खेळाडूंना मिळाले क्षमतेपेक्षाही अधिक पैसे, पण कामगिरीच्या बाबतीत मात्र…
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनच्या आयपीएलमधील विकेटने ‘त्या’ भारतीय गोलंदाजाला मिळाले होते अतिशय महागडे गिफ्ट
बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच पण कौतूकाची थापही जरूर द्या!
ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी, पॉइंट्स टेबलमध्ये या क्रमांकावर असणार मुंबई इंडियन्स