-महेश वाघमारे
भारतीय क्रिकेट संघाला खूप आधीपासून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड आणि दक्षिण आफ्रिका या देशात कसोटी मालिका जिंकण्याची वावडे आहे. अगदी कमी वेळा, भारतीय संघाने या देशांना त्यांच्या मायदेशात जाऊन हरवले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये तर अजूनही भारत आपल्या पहिल्या कसोटी मालिका विजयाच्या प्रतीक्षेत आहे.
या “SENA” देशांपैकी भारताने सर्वप्रथम न्यूझीलंडमध्ये मालिका विजय साकारण्याची किमया १९६७-६८ मध्ये, नवाब मंसूर अली खान पतौडी यांच्या नेतृत्वात केली. तेव्हा न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर ३-१ ने पराभूत केले होते. यानंतर २००९ पर्यंत भारताने न्यूझीलंडचे सहा दौरे केले परंतु ड्रॉ आणि पराभवच हाती लागला.
२००९ मध्ये भारत युवा कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वात न्यूझीलंडमध्ये दाखल झाला. धोनीने आपल्या करिष्माई नेतृत्वाच्या बळावर भारताला टी२० विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियात एकदिवसीय सामन्यांची सीबी सिरीज जिंकून दिली होती.
न्यूझीलंडमध्ये ४१ वर्षापासून कसोटी मालिका विजयाचा दुष्काळ संपविण्याच्या उद्देशाने भारतीय संघ न्यूझीलंडकडे रवाना झाला. धोनीच्या दिमतीला सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, गंभीर, झहीर, हरभजन अशी सगळी अनुभवी मंडळी देखील होती.
दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने हॅमिल्टन येथे होणार होती. धोनीने नाणेफेक जिंकत खेळपट्टीचे स्वरूप पाहून न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गोलंदाजांनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत न्यूझीलंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले. ईशांत शर्माने चार बळी मिळवले. जेसी रायडर व कर्णधार डॅनियल व्हेटोरी यांच्या शतकाने न्युझीलंडच्या २७९ धावा फलकावर लागल्या.
प्रत्युत्तरादाखल, भारतीय संघाच्या सर्वच फलंदाजांनी आपापले योगदान दिले. गंभीर, द्रविड व जहीर खानने अर्धशतके तर सचिन तेंडुलकरने १६० धावांची शानदार खेळी केली. भारताने ५२० धावांचा भलामोठा डोंगर रचला.
दुसऱ्या डावातही भारताने न्यूझीलंडला डोके वर काढू दिले नाही. न्युझीलंडकडून ब्रेंडन मॅकलम व डेरिल फ्लीन यांनी अर्धशतके करत थोडाफार संघर्ष केला. भारताकडून फिरकीपटू हरभजन सिंगने पाच बळी आपल्या नावे केले. भारताला विजयासाठी ३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे गंभीर-द्रविड या सलामी जोडीने पाच षटकातच पूर्ण करून दौऱ्याची अप्रतिम सुरुवात केली.
पहिल्याच सामन्यात मिळालेल्या विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला. न्यूझीलंडला घरच्या मैदानावर एकप्रकारे नामोहरमच करण्याचे काम भारतीय संघाने केले होते. दुसऱ्या कसोटीसाठी दोन्ही संघ नेपियरकडे मार्गस्थ झाले.
नेपियरच्या मॅकलेन पार्कवर दुसरी कसोटी होणार होती. डॅनियल व्हेटोरीने यावेळी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. पहिल्या कसोटीप्रमाणेच यावेळी ही झहीर खान व ईशांत शर्माने न्यूझीलंडचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद केले. २३ धावात तीन गडी तंबूत परतले होते. तेथून जेसी रायडरने आधी जेम्स फ्रॅंकलिन रॉस टेलर, ब्रेंडन मॅकलम व कर्णधार डॅनियल व्हेटोरी यांना साथीला घेत ६१९ धावांचा एव्हरेस्ट उभा केला.
जेसी रायडरने आपले द्विशतक (२०१) पूर्ण केले तर रॉस टेलर व ब्रेंडन मॅकलम यांनी अनुक्रमे १५१ व ११५ धावा बनविल्या. जेम्स फ्रँकलीन व डॅनियल व्हेटोरी यांनी देखील अर्धशतके झळकावली. भारताकडून झहीर खान आणि ईशांत शर्माने प्रत्येकी तीन बळी मिळवले.
६१९ धावांच्या उत्तरासाठी भारतीय संघ सज्ज झाला. न्यूझीलंडचे गोलंदाज इतके मोठे आव्हान दिल्यामुळे आधीच उत्तेजीत झाले होते. त्यांनी भारतीय संघाला लवकरात लवकर बाद करण्याचे ठरवले. डॅनियल व्हेटोरी आणि जेम्स फ्रॅंकलिनने आपल्या गोलंदाजीच्या बळावर भारताला ३०५ धावांवर रोखले. अनुभवी राहुल द्रविड (८३) व वीवीएस लक्ष्मण (७६) यांनी थोडाफार प्रतिकार केला. भारताला फॉलोऑन दिला गेला. भारताचे दोन्ही सलामीवीर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरले. वीरेंद्र सेहवाग आपल्या नेहमीच्या अंदाजात २० चेंडूत २२ धावा करून बाद झाला.
तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताचे धावसंख्या होती ४७/१. भारत अजूनही २६७ धावांनी मागे होता. सामन्याचे दोन दिवस शिल्लक होते. वातावरणही एकदम साफ असल्याने न्युझीलंड मालिकेत बरोबरी साधणार असा कयास सर्वांनी लावला. भारताकडे अजूनही द्रविड, सचिन, लक्ष्मण यासारखे दिग्गज बाकी होते परंतु न्युझीलंड घरच्या मैदानावर खेळत असल्याने त्यांचे पारडे जड होते.
चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. गंभीर व द्रविड या कालच्या नाबाद जोडीने डाव विणायला सुरुवात केली. चेंडू मागून चेंडू, षटकांमागून षटके, तासा मागून तास जात राहिले. गंभीर आणि द्रविड या जोडीने आपला भक्कम बचाव दाखवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चांगले दमवले. अखेरीस चहापानापूर्वी, द्रविड २२० चेंडूत ६२ धावा करून बाद झाला. तत्पूर्वी द्रविड-गंभीर या जोडीने तब्बल ६३ षटके एकत्र फलंदाजी करत १३३ धावांची भागीदारी केली.
द्रविड बाद झाल्यानंतर गंभीरच्या साथीला सचिन मैदानात उतरला. चहापानानंतर गंभीर खूपच काळजीपूर्वक खेळू लागला. त्याने एका तासात अवघी एक धाव काढली होती. त्याच सत्राच्या अखेरीस गंभीरने आपले शतक पूर्ण केले. तो जवळपास एक पूर्ण दिवस फलंदाजी करत होता. दुसऱ्या बाजूने सचिनने आपल्यावरील जबाबदारी पार पाडत अर्धशतक झळकावले. चौथ्या दिवशीच्या अखेरीस सचिन व गंभीर नाबाद राहिले.
पाचव्या दिवशी सचिन पहिल्या सत्रात बाद झाला, परंतु गंभीर अजूनही मैदानावर उभा होता. भारतावरील धोका टळला नव्हता. लक्ष्मणसोबत ९६ धावांची अजून एक बहुमुल्य भागीदारी करत गंभीर बाद झाला. शेवटी लक्ष्मण आणि युवराज यांनी भारत हा सामना हरणार नाही याची काळजी घेतली. लक्ष्मणने आपले एक शानदार शतक (१२४) झळकावले. युवराजने ५४ धावा करत त्याला उत्तम साथ दिली. दोघांनीही नाबाद राहत १२० धावांची भागीदारी केली आणि सामना अनिर्णित राखला.
सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण या दिग्गजांव्यतिरिक्त प्रथमच गौतम गंभीरने संकटमोचकाची भूमिका बजावली होती. गंभीरच्या नावे फक्त १३७ धावा होत्या पण त्यासाठी त्याने ४३६ चेंडूंचा सामना केला होता. त्याने तब्बल ६४३ मिनिटे म्हणजे १० तास ४३ मिनिटे फलंदाजी करत एकहाती किल्ला लढवला. गंभीरची ती खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमची अजरामर झाली.
पुढे, वेलिंग्टन येथील तिसरी कसोटी देखील अनिर्णित राहिली. त्यामध्ये सुद्धा गंभीरने १६७ धावांची दमदार खेळी केली. भारताने ४१ वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका विजय साजरा केला होता.