भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील बेंगलोर येथे रविवारी (१९ जून) झालेला पाचवा आणि निर्णायक टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यानंतर ५ सामन्यांची ही टी२० मालिका २-२ ने बरोबरीत सुटली. या संपूर्ण मालिकेत प्रशंसनीय गोलंदाजी करणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासह भुवनेश्वरने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भुवनेश्वरने (Bhuvneshwar Kumar) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत (5 Matches T20 Series) ६ विकेट्स घेतल्या. त्याने १४.१६ च्या सरासरीने १०.४च्या स्ट्राईक रेटने या विकेट्स काढल्या. भुवनेश्वरपेक्षा जास्त विकेट्स हर्षल पटेलने घेतल्या. त्याने एकूण ७ विकेट्स घेतल्या. मात्र या विकेट्स घेण्यासाठी त्याने ८८ धावा खर्च केल्या, तर भुवनेश्वरने ८५ धावा देत विकेट्स काढल्या. तसेच या मालिकेदरम्यान हर्षलची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी २५ धावांवर ४ विकेट्स इतकी राहिली. तर भुवनेश्वरने १३ धावांवर ४ विकेट्स घेत आपले सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन नोंदवले. अशाप्रकारे प्रदर्शनात हर्षलपेक्षा भुवनेश्वर सरस राहिल्याने त्याला मालिकावीर (Man Of The Series) निवडण्यात आले.
यापूर्वी २०१८ मध्येही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतील प्रदर्शनासाठी भुवनेश्वरला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. अशाप्रकारे भुवनेश्वर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एकापेक्षा जास्त वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिलाच वेगवान गोलंदाज (First Indian Pacer) बनला आहे. तसेच हा विक्रम करणारा तो संयुक्तपणे दुसरा भारतीय खेळाडूही बनला आहे. भुवनेश्वरव्यतिरिक्त फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांनीही प्रत्येकी २ वेळा मालिकावीर पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
तर विराट कोहली या यादीत अव्वलस्थानी आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७ वेळा मालिकावीर बनवण्याचा पराक्रम केला आहे.
मालिकावीर निवडला गेल्यानंतर भुवनेश्वर कुमारने प्रतिक्रिया देत म्हटले की, “मालिकावीर पुरस्कार मिळवणे अभिमानाची बाब असते. मी अजिबात फिट नाहीय. भारतीय संघात माझी भूमिका तीच आहे, जी आधीही होती. मी पावरप्लेमध्ये गोलंदाजी करतो. त्यानंतर मी शेवटच्या षटकातही गोलंदाजी करू शकतो. याशिवाय एका वरिष्ठ खेळाडूच्या रूपात मला संघातील सर्व गोलंदाजांशी बोलावेही लागते. संघाने मला गोलंदाजीचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मेघराजामुळे रद्द झाली पाचवी टी२०, निराश चाहत्यांचा बीसीसीआयवर निशाणा; ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पूर
ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही धोनीचा ‘जबरा फॅन!’, सोशल मीडियावर शेअर केली अभिमानास्पद पोस्ट