यावर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान, दोन्ही संघ तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळतील. या मालिकेतील टी२० सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊ शकते. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. ही टी-२० मालिका विश्वचषक संपल्यानंतर लगेच तीन दिवसांनी १७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, विराट, रोहित, मोहम्मद शमी आणि बुमराहसारखे खेळाडू बऱ्याच काळापासून बायो-बबलमध्ये आहेत आणि गेले कित्येक महिने सतत क्रिकेट खेळत आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपासून ते गेल्या चार महिन्यांपासून सतत क्रिकेट खेळत आहेत. म्हणून डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी सर्व वरिष्ठ खेळाडूंनी आराम करावा अशी मंडळाची इच्छा आहे. विराटने स्वतः कामाचा ताण पाहता टी-२० विश्वचषकानंतर टी -२० कर्णधारपदाचा राजीनामाही दिला आहे.
अशा परिस्थितीत ऋतुराज गायकवाड, व्यंकटेश अय्यर, देवदत्त पडिक्कल, हर्षल पटेल आणि आवेश खान सारख्या युवा खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळू शकते. त्याचबरोबर रोहितला विश्रांती मिळाल्यास भारताला नवीन कर्णधार देखील मिळू शकतो. केएल राहुल आणि रिषभ पंतसारख्या खेळाडूंची नावे या शर्यतीत असतील. त्याचबरोबर चेतन साकारिया, दीपक चहर, शिवम मावी सारखे गोलंदाज भारतीय संघाची गोलंदाजीची धुरा सांभाळतील.
भारतीय क्रिकेट बोर्डाने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्याशी संपर्क साधून त्यांना हंगामी प्रशिक्षक बनवले आहे. द्रविड न्यूझीलंड मालिकेदरम्यान भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा स्वीकार करणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य किंवा निर्णय घेण्यात आलेला नाही. टी२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपत आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला नवीन प्रशिक्षक शोधण्यासाठी थोडा अवधी हवा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अंतिम सामन्यात ‘कॅप्टनकूल’ धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला
‘हा एक हृदयद्रावक शेवट’, आयपीएल ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचूनही पराभूत झाल्यानंतर रिषभ झाला भावूक
टीम इंडियाला मिळणार राशिद खानसारखा अव्वल फिरकीपटू? सचिनने शोधलाय नवा हिरा!